25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्र६ महिन्यांपासून पोलिसांना प्रवासभत्ता, वेतनवाढ नाही

६ महिन्यांपासून पोलिसांना प्रवासभत्ता, वेतनवाढ नाही

एकमत ऑनलाईन

राज्य सरकार अपयशी, पोलिसांत असंतोष
मुंबई : पोलिसांना गेल्या ६ महिन्यांपासून प्रवासभत्ता तसेच वेतनवाढ लागू करण्यात राज्य शासन अपयशी ठरले आहे. याबाबत पोलिसांत असंतोष असून पोलिसांना आपल्या मागण्यांसाठी कुठेही दाद मागता येत नाही. मुंबई पोलिस दलातील एका सहायक फौजदाराने (सहायक उपनिरीक्षक) अशी हिंमत दाखवत थेट राज्यपाल, मुख्यमंत्री, महासंचालक, अतिरिक्त पोलिस आयुक्त व उपायुक्तांकडे तक्रार केली. परंतु या सहायक फौजदाराला आता कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

सहायक फौजदारांवर केलेल्या कारवाईवरून पोलिस दलातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पोलिस हे शिस्तप्रिय दल असून वेळेवर वेतन मिळाले नाही वा देय असलेला भत्ता, लागू झालेली वेतनवाढ ६-६ महिने मिळत नसेल तर पोलिसांनी गप्प बसून राहायचे, असाच संदेश देण्यासाठी ही कारवाई केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ६ महिन्यांपासून थकित प्रवास भत्ता आणि दरमहा जारी झालेली वेतनवाढ मिळावी, यासाठी पोलिसांनी आपल्या वरिष्ठांकडे तगादा लावला. मात्र, लेखी तक्रार करण्याची पद्धत नसल्याने हे पोलिस गप्प होते.

दरम्यान, नायगाव सशस्त्र पोलिस दलातील सहायक फौजदार प्रमोद गावडे यांनी या बाबतचा अर्ज थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केला. या अर्जाच्या प्रती मुख्यमंत्री तसेच पोलिस महासंचालक व सर्व वरिष्ठ पोलिस अधिका-यांना पाठवल्या. मात्र, गावडे यांचे हे वर्तन बेशिस्त व उद्धट असून पोलिसाची प्रतिमा मलिन करणारे असल्याचा ठपका ठेवत २ वर्षे वेतनवाढ का रोखू नये, याबाबत त्यांनाच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. नायगाव विभागाच्या सशस्त्र विभागाच्या उपायुक्तांनी ही कारवाई केली.

दाद कुणाकडे मागायची?
पोलिसांना कामगार संघटना बनविण्याचा अधिकार नाही. अशा रीतीने पोलीस जर तक्रार करणार असतील तर असंतोष माजेल. त्यामुळे पोलिस दलातील संबंधित सहायक फौजदारावर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने व्यक्त केले. परंतु पोलिसांना जर ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रवास भत्ता वा वेतनवाढ मिळत नसेल तर पोलिसांनी कोणाकडे दाद मागायची, असा सवाल पोलिस विचारत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या