पटियाला : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू ४८ दिवस आधीच उद्या (एक एप्रिल २०२३) तुरुंगाबाहेर येणार आहेत. सिद्धू यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन याबाबतची माहिती मिळाली आहे. १९८८ च्या ‘रोड रेज’ प्रकरणात १५ मे २०१८ रोजी त्यांना सुप्रीम कोर्टाने एका वर्षांची शिक्षा सुनावली होती. ‘रोड रेज’ प्रकरणी सिद्धू २० मे २०२२ पासून पटियाला तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. २० मे २०२२ रोजी नवज्योत सिंह सिद्धू यांनी न्यायालयात आत्मसमर्पण केले.
न्यायालयीन प्रक्रियेनुसार, सिद्धू यांचा तुरुंगातील कालावधी १८ मे रोजी पूर्ण होणार होता. पण त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे ४८ दिवस आधी सिद्धू यांना तुरुंगातून लवकर सोडण्यात येत आहे. तुरुंगातून सोडण्यात येणार असल्याची माहिती सिद्धू यांच्या ट्विटर खात्यावर देण्यात आली आहे.
२७ डिसेंबर १९८८ च्या संध्याकाळी सिद्धू हे त्यांचे मित्र रुपिंदर सिंह संधूसोबत पटियालाच्या शेरावले बाजारात, कार पार्किंगवरून ६५ वर्षीय गुरनाम सिंह यांच्याशी त्यांचा वाद झाला. सिद्धू यांनी गुरनाम सिंहला पाडले. त्यानंतर गुरनाम सिंह यांना रुग्णालयात नेण्यात आले. गुरनाम सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर, ट्रायल कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. पण हायकोर्टाने सिद्धू यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावली होती.
१५ मे २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. परंतु मे २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विलोकन याचिकेवर सुनावणी करताना सिद्धू यांना एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.