लातूर : लातूरच्या राजकारणात.,समाजकारणात वेगळी छाप असणारे, लोकांच्या कार्यासाठी सतत झटणारे बहारदार व्यक्तिमत्त्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, लातूरचे माजी नगराध्यक्ष, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष एस. आर. देशमुख (काका) यांचे ५ जून रोजी रविवारी सकाळी ७ वाजता पुणे येथील रुग्णालयात उपचार घेत असताना दु:खद निधन झाले असून त्यांच्यावर सोमवारी ६ जून रोजी सकाळी दहा वाजता लातूर येथील मारवाडी स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे
दिवंगत एस. आर. देशमुख यांच्या पश्चात ४ भाऊ, ३ मुली, १ मुलगा असा मोठा परिवार आहे . एस. आर. देशमुख (काका) यांच्या निधनाने विकासाचा महामेरू हरवला आहे अशा भावना शहरातील अनेक नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. दिवंगत एस. आर. देशमुख यांनी लातूरचे नगराध्यक्ष, लातूर जिल्हा बँकेचे ८ वर्षे अध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी केली होती. सामाजिक, राजकीय, क्षेत्रात विविध संस्थांचे पदाधिकारी म्हणून ते कार्यरत होते.
लोकनेते विलासराव देशमुख, राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री ना.अमित देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार धिरज देशमुख यांचे खंदे समर्थक होते. लातूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या विविध निवडणुकांत प्रभावीपणे कार्य करत ग्राऊंडमध्ये जाऊन भक्कम पायाउभारणीचे काम त्यांनी केले.
देशमुख कुटुंबियांकडून सांत्वन
माजी नगराध्यक्ष एस. आर. देशमुख यांचे निधन झाल्याची वार्ता कळताच राज्याचे माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, पालकमंत्री ना.अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख यांनी दिवंगत एस. आर. देशमुख यांचे चिरंजीव गणेश देशमुख यांच्याशी बोलून कुटुंबाचे सांत्वन केले.