मुंबई : १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करीत चार जणांना अटक केली आहे. त्यानंतर त्यांना ७ दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवण्यात आले आहे.
१९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात सीबीआयने ४ जणांना ताब्यात घेतले आहे. सय्यद कुरेशी, शोएब कुरेशी, शोएब बाबा, युसूफ भटका आणि अबू बकर अशी या चार आरोपींची नावे आहेत. या चौघांना गुजरात एटीएसने गेल्या आठवड्यात अटक केली होती. केंद्रीय यंत्रणेने या चार जणांना मुंबईतून ताब्यात घेतले. या चौघांना आता ७ दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवण्यात आले आहे. बनावट पासपोर्टच्या आधारे हे चारही आरोपी पाकिस्तानात फरार झाले होते.
१९९३ साली मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यावर हे सर्व आरोपी परदेशात पळून गेले होते. हे आरोपी बनावट पासपोर्टच्या आधारे अहमदाबादमध्ये आले होते. या संदर्भात गुजरात एटीएसला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. गुजरात एटीएसची ही एक मोठी कारवाई मानली जात आहे.
एनआयएने ९ मे रोजीच्या पहाटे मुंबईसह नालासोपारा आणि इतर असे एकूण २७ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. यानंतर एनआयएने ५७ लोकांना चौकशीकरिता बोलावले होते. ज्यापैकी १८ जणांची एनआयए कसून चौकशी करत होती. त्यापैकी छोटा शकीलचे नातेवाईक आरीफ आणि शब्बीर शेख या दोघांच्या विरोधात एनआयएला ठोस पुरावे आढळल्याने त्यांना एनआयएने १३ मेच्या पहाटे अटक करुन कोर्टात हजर केले.
डी गँगच्या कटात सामिल
१९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात आरीफ आणि शब्बीर हे दोघेही आरोपी होते. पण नंतर पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या नंतरही हे दोघे छोटा शकीलमार्फत डी गँगच्या संपर्कात आहेत. हे अनेकदा समोर आले होते. पण देशात घातपात घडवण्यासाठी डी गँग रचत असलेल्या कटात हे दोघे शामिल होते, याचा खुलासा एनआयएने काही दिवसांपूर्वी कोर्टात केला होता.