लातूर : महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधून फेब्रुवारी 2019 मध्ये एम.बी.बी.एस. परीक्षा उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या आणि इंटर्नशीप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सद्यपरिस्थितीत तात्पुरते पदवी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे एम.बी.बी.एस. उत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी करता येणार असून सुमारे चार हजार डॉक्टर्स सध्याच्या कोविड परिस्थितीत वैद्यकीय सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत.
इंटर्नशीप पूर्ण करणाऱ्या या विद्यार्थ्यांना तातडीने तात्पुरती पदवी प्रमाणपत्रे देण्यात यावीत अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दीलीप म्हैसेकर यांना दिल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी या डॉक्टरांच्या सेवा वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये घेणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
नाशिक येथील आरोग्यविज्ञान विद्यापीठामार्फत नोव्हेंबर 2018 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी 2019 मध्ये घोषित करण्यात आला होता. यात सुमारे चार हजार विद्यार्थी एम.बी.बी.एस. परीक्षा उत्तीर्ण झाले होते या विद्यार्थ्यांची इंटर्नशिप एक मार्च 2019 ते 28 फेब्रुवारी 2020 दरम्यान पूर्ण झाली आहे. इंटर्नशिप पुर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभाची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. पदवीदान समारंभाची वाट न पाहता या विद्यार्थ्यांना तात्पुरती पदवी प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याने हे विद्यार्थी वैद्यकीय सेवेत दाखल होण्यास पात्र ठरणार आहेत. सध्याच्या परिस्थितीत कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची कमतरता भासत आहे. या निर्णयामुळे वैद्यकीय सेवेसाठी मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स उपलब्ध होणार असल्याने आरोग्य सेवेवरील ताण कमी होण्यास मदत होईल असेही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी म्हटलेआहे
Read More वाहनचालकांच्या खिशाला कात्री, एक जूनपासून पेट्रोल डिझेल महागणार
डॉक्टरांना दरमहा 80 हजार रुपये मानधन
जे डॉक्टर 45 वर्षापेक्षा कमी आहेत आणि ज्यांना कुठलाही आजार नाही आणि ज्यांनी त्यांची इंटर्नशिप पूर्ण केली आहे आणि ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आहे अशा डॉक्टरांना मानधन तत्त्वावर कोविड कालावधीसाठी गरजेनुसार घेण्यात येणार आहे. या डॉक्टरांना दरमहा 80 हजार रुपये मानधन दिले जाईल. डॉक्टरां प्रमाणे फिजिशियन यांनाही मानधन तत्वावर घेण्यात येणार आहे. भूलतज्ञ आणि इंटेन्सिविस्ट यांना दरमहा दोन लाख रुपये मानधन देण्यात येणार आहे.
बृहन्मुंबईतील नर्सेसची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांनाही मानधन तत्वावर घेण्यात येणार आहे . ज्यांनी बी.एसस्सी. किंवा जी.एन.एम. नर्सिंग कोर्स पूर्ण केला आहे आणि ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आहे त्यांना दरमहा 30 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.
गुगल सीटवर अर्ज करावेत
डॉक्टर आणि नर्सेस यांना हे मानधन बृहन्मुंबई महानगरपालिके मार्फत देण्यात येणार आहे. पात्र डॉक्टरांनी https://forms.gle/PtCY3SvhvEA43WxV6 या गुगल सीटवर तसेच पात्र नर्सेस यांनी https://forms.gle/81LcWWajq1WNQ6cK8 या गुगल सीटवर अर्ज करावेत असे आवाहनह वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.