24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeस्त्री जाणीवांचा ताजा संदर्भ खोपा

स्त्री जाणीवांचा ताजा संदर्भ खोपा

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद येथील कथालेखिका सुनीता गुंजाळ- कवडे यांचा ‘खोपा’ हा कथासंग्रह गौरव साहित्यालय, सोलापूर यांनी नुकताच प्रकाशित केला. त्यामध्ये वर्तमान स्त्री जाणीवांचा ताजा संदर्भ असणा-या २१ कथांचा समावेश आहे. या कथासंग्रहाला महाराष्ट्रातील ज्येष्ठ अभ्यासिका डॉ. श्रृतीश्री वडगबाळकर यांची अभ्यासपूर्ण, वाचनीय प्रस्तावना आहे तर प्रा. दीपक पाटील यांनी आकर्षक मुखपृष्ठ दिल्यामुळे या कथासंग्रहाची वाङ्मयीन सौंदर्यदृष्टी अतिशय उंचीची ठरली आहे. मराठवाड्याच्या साहित्य परंपरेला स्त्री कथा लेखिकेचा खूप मोठा सामर्थ्यशाली वारसा आहे. छाया महाजन, ललिता गादगे, मधू सामंत, इंदुमती जोंधळे. इतर कथा लेखिकांचा आणि सुनीता गुंजाळ यांच्या कथेचा तुलनात्मक अभ्यास केला तर ही कथा तसूभरही कमी वाटत नाही. कौटुंबिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात आजच्या सुशिक्षित स्त्रियांचा होणारा कोंडमारा, दमछाक या कथांमधून उलगडून दाखविली आहे.

लेखिकेने प्रत्येक नायिकेच्या मनाचा तळ शोधण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. ‘रिझर्व्हेशन’ मधील रूपाली सुशिक्षित, नोकरी करणारी, तिची स्वतंत्र प्रतिमा स्त्रीत्वाचा शोध घेणारी केंद्रस्थानी ठेवून वर्तमान स्थितीमध्ये स्त्रीजीवनाचे वास्तव आणि सकस दर्शन घडविले आहे. निर्णय, रूम नं. ४२१ या कथांमधून स्वाभिमानी आणि आदर्श समाज निर्माण करणा-या नायिकांद्वारे समाजामध्ये प्रबोधन करण्याच्या प्रयत्नासोबत ज्वलंत, विविध प्रश्न, समस्या घेऊन या कथा अवतरल्या आहेत. नवा टीव्ही, पारिजात, आभाळमाया, चक्रव्यूह, अभीष्टचिंतन, घुसमट, वा! असा ही बाप, भूलभुलैया, ताजमहाल, परतफेड, हे बंध रेशमाचे या कथांमधून स्त्री म्हणून समाजात जगत असताना सुनीता गुंजाळ यांनी आजूबाजूच्या वर्तमानाचा अगदी बारकाईने कानोसा घेतला आहे. स्त्रीच्या मनात काय झिरपत गेलं आणि साठलं तेच यथावकाशपणे वाहत्या झ-­यासारखे प्रत्येक कथेमध्ये कथानकाच्या रूपाने शब्दबद्ध झाले आहे. स्त्रीजीवनाकडे निखळ मानवी दृष्टीने पाहणे कसे इष्ट आहे, हेच या कथा सुचवितात. संवादासाठी वापरलेली भाषा ही स्वभाषा आहे. कोणत्याच लेखकासाठी भाषेचा परप्रकाश उपयोगी नसतो. हे तत्त्व त्यांनी स्वीकारून ‘भाषा म्हणजे मन’ हे तत्त्व एकूण कथानकातून सिद्ध केले आहे. विकसित आणि प्रगल्भ मनाचा भाषिक आविष्कार या कथासंग्रहातून झाला आहे.

‘खोपा’ ही शीर्षक कथा आरू आणि मोहनरावांचे भावविश्व उलगडून दाखविणारी आहे. हाच आशय एकूण कथासंग्रहाला व्यापून राहिला आहे. ‘पंखात बळ देणं आपलं काम, पंखात बळ आल्यावर पाखरं उडणारच ना’ ही समन्वयाची भूमिका या कथासंग्रहाच्या केंद्रस्थानी आहे. तर ‘मेथी पराठा ’ ही धनाजी या शेतक-याची वास्तव कथा आहे. ‘माझा बस प्रवास आणि सुगरण सुनबाई’ या कथा विनोदी, हलकेफुलके कथानक आणि किस्से सांगून आपल्या कथालेखनाची वेगळी चुणूक या लेखिकेने दाखवली आहे. सुनीता गुंजाळ यांना ‘स्त्री म्हणून आलेला खास अनुभव स्त्रीने सांगणे’ या भूमिकेतून कथा साहित्याकडे वळल्या. उच्च मध्यमवर्गीय स्त्रीच्या जीवनातील संघर्ष, विवाहबा संबंधात येणारे मानसिक ताणतणाव, स्त्रीच्या मनातील वैचारिक व भावनिक संघर्ष ‘खोपा’ या कथासंग्रहातून प्रकट झाला आहे. ही कथा वेगवेगळ्या रूपातून आविष्कृत झाली आहे. लेखिकेने आपल्या अनुभवाचे क्षितिज विस्तारून विविध जीवनानुभूतीचे रंग या कथेमध्ये भरले आहेत. स्त्रीकडे पाहण्याचा समाजमनाचा दृष्टिकोन आधुनिक असल्यामुळे ही कथा वर्तमान स्त्रीजाणीवांचा ताजा संदर्भ अधोरेखित करणारी आहे.
खोपा
गौरव साहित्यालय, सोलापूर
किंमत – रु. २५०/- पृष्ठे – १४६

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या