बँकॉक : फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना असे म्हटले जात असून पुढचा आठवडा हा व्हॅलेंटाईन वीक म्हणून साजरा केला जाणार आहे. या आठवड्यानिमित्त थायलंडमध्ये वर्षभर आता मोफत कंडोम वाटप करण्यात येणार आहे.
७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी हा आठवडा व्हॅलेंटाईन वीक म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त बाजारपेठही गिफ्ट्स, लाल फुलं, डेकोरेटिव्ह गोष्टी या सगळ्यांनी सजली आहे. याच व्हॅलेंटाईन वीकनिमित्त थायलंडमध्ये मोफत कंडोम वाटण्यात येणार आहेत.
लैंगिक संबंधामार्फत पसरणारे आजार तसेच किशोरवयीन गरोदरपण रोखण्यासाठी, सुरक्षित लैंगिक संबंधांविषयी जागृती करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. १ फेब्रुवारीपासून एका वर्षासाठी आठवड्याला १० कंडोम एका व्यक्तीला मिळणार आहेत. हे कंडोम चार साईझमध्ये उपलब्ध असणार आहेत. कोणत्याही मेडिकलमध्ये किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हे कंडोम सहज उपलब्ध होतील.