पुणे : राज्यातील शहरांसह, उपनगरांत दर्जेदार फळ व पालेभाज्यांचा तुटवडा निर्माण झाला असून बाजारात मागणी अधिक आणि आवक कमी झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात बहुतांश फळभाज्यांच्या किलोच्या भावाने शंभरी ओलांडली आहे, तर काही भाज्यांचे भाव १५० रुपयांपर्यंत पोचले आहेत. पालेभाज्यांच्या गड्डीचे भाव ४० ते ३० रुपये झाले आहेत.
मागील दोन महिन्यांत पडलेल्या उन्हाचा परिणाम फळभाज्यांवर झाला आहे. उन्हाचा तडाखा आणि पाणी टंचाई यामुळे भाज्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. तसेच, बाजारात येणा-या भाज्यांची प्रतवारीदेखील तितकी दर्जेदार नाही. बाजारात चांगल्या भाज्यांना मागणी जास्त आहे. त्यामुळे भाज्यांच्या भावात वाढ झाली आहे. तसेच, भाज्यांचे भाव आणखी वाढतील, अशी शक्यता किरकोळ बाजारातील भाजीपाला विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी व्यक्त केली.
केटरिंग व्यावसायिक, तसेच हॉटेलचालकांकडून भाज्यांना चांगली मागणी आहे. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. वाढलेल्या भावामुळे भाज्या खरेदी करताना सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होत आहे.
कच्चे लिंबू बाजारात
लिंबाच्या वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी शेतक-यांकडून लहान व कच्च्या लिंबाची तोड करून बाजारात व्रिक्रीस पाठविण्यास सुरुवात झाली आहे. जी लिंबे बाजारात जून व जुलैमध्ये यायला हवी होती, ती लवकर तोडल्याने आताच बाजारात येत आहेत. त्यामुळे बाजारात येत असलेल्या लिबांमध्ये अपेक्षित रस नाही. परिणामी, खरेदी करण्याकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
पालेभाज्यांचा तुटवडा
पालेभाज्या आणि फळभाज्यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे त्यांचे भाव तेजीत आहेत. जोपर्यंत बाजारात आवक वाढणार नाही, तोपर्यंत भाज्यांचे भाव तेजीत राहणार असल्याचे व्यापा-यांचे म्हणणे आहे.
किरकोळ बाजारातील भाज्यांचे भाव
भाज्या……………भाव
हिरवी मिरची……………१००-१२०
घेवडा……………१८०-२००
वाटाणा……………१८०-२००
पावटा……………१२०-१४०
शेवगा……………८०-१००
टोमॅटो……………८०-१००
दोडका……………८० -१००
वांगी……………७०-८०
फ्लॉवर……………८०-१००
पालेभाज्यांचे एका गड्डीचे भाव
कोंिथबीर……………३०-४०
मुळा……………३०
मेथी……………३०
कांदापात……………३०
अंबाडी……………३०
चाकवत……………३०