नोहर : काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगचे बळी ठरलेले बँक मॅनेजर विजय कुमार यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांच्या गावात आणण्यात आला. मृतदेहासोबत विजयची पत्नी मनोज कुमारीही होती. संपूर्ण रस्त्यात त्या धीर धरून बसल्या होत्या पण घराच्या उंबरठ्यावर येताच त्यांच्या भावनांचा बांध फुटला आणि सासूच्या गळ्यात पडून मोठ्याने रडू लागल्या. त्यानंतर बेशुद्ध झाल्या. विजय कुमारच्या आई आणि वडिलांच्या बाबतीतही असेच होत होते. पालक पुन्हा पुन्हा बेशुद्ध होत होते.
मुलाचा मृतदेह पाहून आई त्याला बिलगून राहिली आणि पुन्हा पुन्हा तेच बोलत राहिली, मी तुला सांगितले होते, नोकरी सोड, तू कमी कमावशील, पण तू ऐकले नाहीस. कधी ती सुनेला सांभाळत होती तर कधी मुलाकडे बघून स्वत:च रडायची. मृतदेह येण्यापूर्वीच ग्रामस्थ व नातेवाईकांनी अन्त्यसंस्काराची पूर्ण तयारी केली होती. यानंतर काही वेळात अन्त्ययात्रा सुरू झाली आणि सकाळी नऊच्या सुमारास विजय कुमार यांच्यावर अन्त्यसंस्कार करण्यात आले.
अन्त्यविधीला संपूर्ण गाव जमा झाले
विजयच्या हत्येनंतर संपूर्ण गावात संतापाचे वातावरण आहे. गुरुवारी ही दु:खद बातमी आल्यापासून गावातल्या एकाही घरात चूल पेटलेली नाही. विजयच्या घरी लोकांची ये-जा सुरूच होती. रात्री सुध्दा अनेक लोक स्वत:च्या घरी गेले नाहीत. सकाळी मृतदेह गावात पोहोचला. शेवटच्या प्रवासात संपूर्ण गाव जमा झाले.