नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी तारीख जाहीर केली आहे. १८ जुलैला राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होईल. २१ जुलैला देशाला नवे राष्ट्रपती मिळतील. २९ जूनपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येतील. दरम्यान, डाव्या पक्षांनी महात्मा गांधी यांचे नातू गोपाळ कृष्ण गांधी यांचे नाव सुचवले आहे.
आगामी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी डाव्या पक्षांनी महात्मा गांधी यांचे नातू गोपाळ कृष्ण गांधी यांचे नाव सुचवले आहे. यासोबतच त्यांनी या प्रकरणी विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डाव्या पक्षांनी मंगळवारी शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पश्चिम बंगालच्या माजी राज्यपालांचे नाव सुचविले. पवारांनी या सूचनेला विरोध केला नाही. आजच्या बैठकीत त्यांच्या नावाचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
२०१७ मध्ये भारताच्या उपराष्ट्रपतिपदासाठी गांधी हे सर्वसंमतीने विरोधी पक्षाचे उमेदवार होते, परंतु निवडणुकीत ते एम. व्यंकय्या नायडू यांच्याकडून पराभूत झाले होते. ७७ वर्षीय माजी नोकरशहा यांनी दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणूनही काम केले आहे. ते महात्मा गांधी आणि सी. राजगोपालाचारी यांचे नातू आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराच्या विरोधकांच्या निवडीबाबत चर्चा करण्यासाठी विविध विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. काही नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, पवार यांनी ही उमेदवारी नाकारली आहे.
विद्यमान रामनाथ कोविंद यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी १८ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. कोविंद यांनी गेल्या राष्ट्रपती निवडणुकीत संयुक्त विरोधी उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला होता.