अत्याचार करून जंगलात फेकले; रात्रभर रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत होती पीडिता
भंडारा : दिल्लीतील निर्भया प्रकरणापेक्षा भयंकर घटना महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात घडली आहे. मदतीच्या बहाण्याने एकाच महिलेवर दोन जिल्ह्यांत सामूहिक अत्याचार झाल्याच्या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. कन्हाळमोह परिसरात ३५ वर्षीय महिलेवर अमानुष पद्धतीने अत्याचार करण्यात आला आहे. महिलेची प्रकृती बिकट असून नागपुरातील मेडिकलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अत्याचारपीडित महिला गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील रहिवासी आहे. पतीने नांदवायला नकार दिल्यानंतर पीडिता तिच्या बहिणीच्या घरी राहायची. ३० जुलै रोजी तिचा बहिणीसोबत किरकोळ वाद झाला. रागाच्या भरात तिने घर सोडले आणि माहेरी जाण्यासाठी निघाली. मात्र, तिथेच घात झाला. मदतीच्या बहाण्याने एका कारचालकाने तिच्यावर तब्बल दोन दिवस बलात्कार केला. ३१ जुलै रोजी पळसगाव येथे अत्याचार करून जंगलात सोडून दिले.
पीडित महिला जंगलात भटकत असताना १ ऑगस्ट रोजी भंडारा शहराजवळील कान्हालमोह येथील धर्मा ढाबा येथे आली. तेव्हा एक व्यक्ती तिच्याजवळ आला. ‘घरी नेऊन सोडतो,’ असे म्हणाला. पण, महिलेला त्याच्यावर विश्वास बसला नाही. तेव्हा दुस-या व्यक्तीने विश्वास दिल्यावर महिला सोबत जाण्यास तयार झाली.
त्यानंतर पहिल्या व्यक्तीसोबत दुचाकीवर बसून महिला निघाली. पण, दोघांनीही तिच्यावर शेतात नेऊन अत्याचार केला. नंतर तिथेच सोडून दोघांनीही पळ काढला.
अत्याचारानंतर रात्रभर पीडिता तशीच पडून होती. अत्याचारामुळे तिने शुद्ध गमावली होती. कान्हालमोह येथे रात्रभर पीडिता वेदनेने विव्हळत होती त्याचवेळी गावातील तरुणांचे तिच्याकडे लक्ष गेले.
गावकरीही तिच्या मदतीसाठी धावले. पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली. महिला विवस्त्र होती व वेदनेने कण्हत होती. पोटापासून पायापर्यंत रक्ताने शरीर माखले होते. प्रचंड रक्तस्त्रावामुळे महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपींनी पीडितेच्या गुप्तांगावर धारदार शस्त्रांनी गंभीर जखमा केल्या आहेत. त्यामुळे पीडितेच्या गर्भाशयापर्यंत जखम झाली आहे.
पीडितेची प्रकृती नाजूक असून वारंवार तिची शुद्ध हरपत आहे. सध्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. महिलेला मेडिकलमध्ये आणले त्यावेळी ती बेशुद्धावस्थेत होती. तिला प्रचंड रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे तिच्यावर तातडीने एक शस्त्रक्रिया करण्यात आली. आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. सध्या तिला मेडिकलच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.