25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeबीडपरळीमध्ये जिलेटन कांड्याचा साठा जप्त

परळीमध्ये जिलेटन कांड्याचा साठा जप्त

एकमत ऑनलाईन

३ आरोपी अटकेत, राखेसाठी स्फोटाची योजना
परळी : बीडमध्ये आज सकाळी स्फोटासाठी लागणा-या जिलेटीनच्या कांड्या आणि अनेक वस्तू जप्त करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली. पोलिसांनी या प्रकरणी ३ आरोपींना अटक केली. या आरोपींच्या चौकशीनंतर धक्कादायक माहिती समोर आली असून, आरोपींनी राखेसाठी स्फोटाचा प्लॅन आखला होता. विशेष म्हणजे ज्या भागात स्फोट घडवून आणला, त्या परिसराजवळच विद्युत केंद्र आहे. त्यामुळे मोठा विध्वंस होण्याचा धोका होता. अखेर स्फोट होण्याआधीच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्याने मोठा अनर्थ टळला.

बीडच्या परळी औष्णिक विद्युत केंद्राला अवैध राख माफियांचे ग्रहण लागले आहे. त्यातूनच परळीच्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या परिसरात स्फोटासाठी लागणा-या जिलेटिनच्या कांड्या, तोटे आणि बॅटरी असे साहित्य जप्त केले. त्यानंतर परळीतील नागरिकांनी मोठी भीती व्यक्त केली असून, अगोदर राखेने श्वास गुदमरत होता. आता भीतीने गुदमरत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

सुरक्षा रक्षकामुळे
स्फोटाचा कट उधळला
बीडच्या परळीतील औष्णिक विद्युत केंद्र असणा-या थर्मलच्या परिसरात राख साठविण्यासाठी स्फोटाचा कट आखण्यात आला होता. हा कट सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे परळी ग्रामीण पोलिसांनी उधळून लावला. यावेळी पोलिसांनी तात्काळ अ‍ॅक्शन घेत थर्मल परिसरात राखेचे काम करणा-या ३ कामगारांना अगोदर ताब्यात घेतले.

१०३ कांड्यांसह
अन्य साहित्य जप्त
आरोपींकडे १०३ जिलेटीनच्या कांड्या, १५० तोटे, ३ बॅटरी आणि वायर मिळाली आहे. दरम्यान पकडलेल्या ३ आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेमुळे परळी परिसरात खळबळ उडाली आहे.

अवैध राख वाहतूक थांबवावी
राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे शहर म्हणून ओळखल्या जाणा-या परळी शहरात राख माफियांमुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. या अगोदर असुरक्षित राखेच्या वाहतुकीमुळे अपघात होवून अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत, तर अनेकांना कायमस्वरूपीचे श्वसनाचे आणि डोळ््याचे आजार जडले आहेत. इथले नागरिक राखेची समस्या सोडवा, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या