चंदिगढ : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे आज पटियाला न्यायालयात हजर राहणार होते. मात्र, प्रकृतीचे कारण सांगून त्यांनी न्यायालयापुढे शरण येण्यासाठी वेळ देण्याची विनंती सिद्धू यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.
सिद्धू यांनी एक आठवड्याचा वेळ देण्याची विनंती केली आहे. दरम्यान, यावर न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर यांच्या खंडपीठाने मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. रमण यांना सुनावणीसाठी विनंती केली आहे. सिद्धूचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले की, सिद्धू यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव शरण येण्यासाठी काही आठवड्यांची विनंती केली आहे.
दरम्यान, सरन्यायाधीशांनी आतापर्यंत कोणत्याही खटल्याचा उल्लेख ऐकून घेण्यास नकार दिला आहे. पटियाला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नरिंदर पाल लाली यांनी पक्ष समर्थकांना दिलेल्या संदेशात सांगितले होते की, सिद्धू सकाळी १० वाजता न्यायालयात पोहोचणार आहेत. पक्षाच्या समर्थकांना सकाळी ९.३० वाजता न्यायालयाच्या आवारात पोहोचण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले होते.
न्यायालयाच्या भूमिकेवर लक्ष्य
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सिद्धूची पत्नी नवज्योत कौर सिद्धू या अमृतसरहून रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पटियालाला पोहोचल्या आहेत. मात्र, अचानक सिद्धू यांनी शरण येण्यास वेळ देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आता न्यायालय नवज्योतसिंग सिद्धू यांच्या विनंतीवर काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.