सॅन फ्रान्सिस्को : काँग्रेस नेते राहुल गांधी सहा दिवसाच्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय प्रवासींच्या मेळाव्याला संबोधित करताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर तीव्र निशाणा साधला आहे. भारत जोडो यात्रा’ रोखण्यासाठी मोदी सरकारने सर्व शक्ती पणाला लावली होती असा त्यांनी दावा केला. राहुल गांधी मंगळवारी अमेरिकेतील तीन शहरांचा दौरा करणार आहेत. राहुल गांधी यांनी भारतीय-अमेरिकनांना संबोधित करणे आणि वॉल स्ट्रीटचे अधिकारी आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. ४ जून रोजी न्यूयॉर्कमधील जॅविट्स सेंटर येथे जाहीर सभेने ते आपल्या दौऱ्याची सांगता करणार आहेत.
भारत जोडो यात्रेविषयी बोलताना ते म्हणाले की, यात्रेने आपुलकी, आदर आणि नम्रतेची भावना पुढे नेली. इतिहासाचा अभ्यास केला तर असे दिसून येईल की, गुरु नानक देवजी, गुरु बसवण्णा जी, नारायण गुरुजी यांच्यासह सर्व अध्यात्मिक व्यक्तींनी देशाला समान मार्गाने एकत्रित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या काही आठवड्यांपूर्वी राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी २२ जूनला अमेरिकेला पोहोचणार आहेत. २२ जून रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि फर्स्ट लेडी पीएम मोदींसाठी स्टेट डिनरचे आयोजन करण्यात आले आहे.
जातीय जनगणना समाजाचा क्ष-किरण
जातीय जनगणनेवर बोलताना राहुल म्हणाले की, जातीय जनगणना समाजाचा क्ष-किरण असेल, ज्यातून जातीभेदाची व्याप्ती कळेल. न्याय आणि मनरेगासारख्या योजना गरिबांना आर्थिक न्याय मिळवून देण्यास मदत करतील असेही ते म्हणाले.
धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन
राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर संविधानावर हल्ला केल्याचा आरोप करत ते म्हणाले की, ते जाती आणि धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत.