मुंबई,दि.११ (प्रतिनिधी) मंत्रालय व अन्य शासकीय कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी हे सरकारचे प्रतिनिधी असतात. त्यांची वेशभूषा ही कार्यालयाला अनुरूप असली पाहिजे, असे अधोरेखीत करताना राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड ठरवून दिला आहे. जीन्स, टी-शर्ट, भडक कपडे घालून कार्यालयात येऊ नये,असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. आठवड्यात किमान एक दिवस खादीचे कपडे वापरावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयापासून तालुका स्तरावरील शासकीय कार्यालयांमध्ये अनेक अधिकारी-कर्मचारी कामावर टि- शर्ट- जीन्स अशा कॅज्युअल पेहरावात कामावर येतात.
त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कार्यालयात कसे यावे हे सांगण्याची वेळ सामान्य प्रशासन विभागावर आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. शासकीय कार्यालयांतून सरकारचा कारभार चालतो. ही कार्यालये म्हणजे राज्य शासनाचे जनतेतील प्रतिनिधी असतात. या कार्यालयांत सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची येजा असते. सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेशभूषेवरून सरकारची प्रतिमा निर्माण होत असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांची वेषभूषा शासकीय कार्यालयाला अनुरूप असणे आवश्यक असून त्यासाठी ड्रेसकोड ठरवण्यात येत असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
जीन्स, टी-शर्ट स्लीपर्स नको !
राज्य सरकारच्या शासनाच्या सेवेतील कर्मचारी व अधिकारी तसेच कंत्राटी तत्वावर कार्यालयांत नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी व सल्लागार म्हणून शासकीय कामासाठी येणाऱ्या व्यक्ती अशा सर्वांसाठी सरकारने पेहराव कसा असावा याबत काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. पेहराव नेहमी व्यवस्थित असावा. महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयात साडी, सलवार/चुडीदार कुर्ता, ट्राऊझर पॅण्ट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा असा पेहराव करावा. पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅण्ट/ट्राऊझर पॅण्ट असा पेहराव करावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले पेहराव परिधान करू नयेत. तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी जीन्स व टी-शर्टचा वापर कार्यालयामध्ये करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
खादीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा (शुक्रवारी) खादी कपड्याचा पेहराव परिधान करावा. परिधान केलेले पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा. कार्यालयीन वेळेमध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे ओळखपत्र दर्शनी भागावर धारण करावे. महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला, सॅण्डल, बूट (शूज) यांचा वापर करावा. तसेच पुरुष अधिकारी व कर्मचारी यांनी बूट (शूज), सॅण्डल यांचा वापर करावा. कार्यालयामध्ये स्लिपर्सचा वापर करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
सात वर्षांपासून लातूर महापालिकेचे पथविक्रेता धोरण थंड बस्त्यात