28.9 C
Latur
Saturday, June 3, 2023
Homeमहाराष्ट्रविधिमंडळ कामकाजाबद्दल सरकारची बेफिकिरी

विधिमंडळ कामकाजाबद्दल सरकारची बेफिकिरी

एकमत ऑनलाईन

लोकशाहीसाठी घातक, अजित पवार यांची सरकारवर टीका

मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची सभागृहात उपस्थिती नसल्याने प्रश्न, लक्षवेधी सूचना राखून ठेवण्याची वेळ अध्यक्षांवर अनेकदा आली. आपल्या राजकिय कारकिर्दीत पाहिलेले असे पहिलेच अधिवेशन असेल, अशी खंत व्यक्त करत विधिमंडळाच्या कामकाजाबद्दल सरकारची अनास्था, बेफिकिरी लोकशाहीसाठी धोकादायक ठरेल, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टिकेची तोफ डागली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानभवनातील पत्रकार कक्षात पत्रकांराशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी बोलताना पवार यांनी अर्थसंकल्पिय अधिवेशनातील अनेक विषयांवरुन सरकारवर हल्लाबोल केला. मंत्र्यांना सत्ता पाहिजे, सरकारी बंगले पाहिजेत, गाड्या पाहिजेत, पण यांना काम करायचे नाही, असा हा सरकारचा कारभार चालला आहे, अशी टीका करत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय यायचा तेव्हा येईल, पण जोपर्यंत सत्तेत आहात, तोपर्यंत तरी काम करा, असे खडेबोलही त्यांनी सरकारला सुनावले.

…तर जनताही तुम्हाला गांभीर्याने घेणार नाही

विधीमंडळ कामकाजाबद्दल सरकारची अनास्था हा सुद्धा गंभीर धोका आहे. विधीमंडळात आमदारांकडून जनतेचे प्रश्न मांडले जातात. परंतु सरकार याकडे गांभीर्याने बघणार नसेल, तर जनताच यांना गांभीर्याने घेईल, असा इशाराही अजित पवार यांनी यावेळी दिला. महाविकास आघाडीचे सरकार असताना आम्ही अधिवेशनकाळात विरोधी पक्षनेता या नात्याने, सकाळी कामकाज सुरु झाल्यापासून, रात्री कामकाज संपेपर्यंत कायम सभागृहात उपस्थित राहिलो. विरोधी पक्षाच्या आमदारांनीही पूर्णवेळ उपस्थिती लावली. विधीमंडळाचे अधिवेशन हे राज्यातील जनतेचे प्रश्न मांडण्याचे आणि सोडवण्याचे व्यासपीठ असल्याने, सभागृहाचे कामकाज बंद पडू नये, ते पूर्ण वेळ चालावे, यासाठी सरकारपेक्षा, आमची विरोधी पक्षांचीच आग्रही भूमिका आणि प्रयत्न राहिला असेही पवार यांनी आवर्जून सांगितले.

सरकारचा कारभार ‘हम करेसो कायदा’ : नाना पटोले

राज्यात भाजपाप्रणित सरकार आल्यापासून जनतेच्या पैशाची लूट सुरु आहे. मागील ९-१० महिन्यात शिंदे फडणवीस सरकारने तिजोरी लुटण्याचे काम केले आहे. जी-२० परिषदेच्या बैठकांवर वारेमाप पैशांची उधळपट्टी करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे पण शेतकठयांना देण्यासाठी नाही. दिल्लीत अदानीच्या रुपाने तर राज्यात अजय अशरच्या रुपाने सरकारी तिजोरी लुटण्यासाठी बसवले आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. शेतकठयांना नुकसान भरपाई दिली नाही, तरुणांच्या समस्यांवर उत्तरे दिली नाहीत. आतातर नोकरीसाठी आऊटसोर्सिंग करण्याचा निर्णय घेऊन तरुणवर्गाला मोठ्या अंधारात ढकलण्याचे काम केले आहे. या सरकारचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणतात शेतकरी आत्महत्या तर रोजच होत असतात, इतके असंवेदनशील सरकार कधी इतिहासात झाले नाही. विरोधी पक्ष म्हणून आम्ही जनतेचे प्रश्न मांडले पण हे सरकार मात्र ‘हम करेसो कायदा’, या पद्धतीने वागले, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या