24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्राइम‘लोन अ‍ॅप’ मुळे नातीने घेतले आजीचे प्राण

‘लोन अ‍ॅप’ मुळे नातीने घेतले आजीचे प्राण

एकमत ऑनलाईन

पुणे : अ‍ॅपवरून घेण्यात आलेल्या कर्जामुळे तरुणांकडून टोकाचे पाऊल उचलले जात आहे. पुण्यातही अशीच घटना समोर आली आहे. अ‍ॅपवरून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी नातीनेच आजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील वारजे परिसरात ही घटना घडली आहे. सुलोचना सुभाष डांगे असे ७० वर्षीय हत्या झालेल्या आजीचे नाव आहे. या घटनेमुळे वारजेतील आकाशनगर परिसर हादरला आहे.

लोन ऍपवरून गौरी डांगे या नातीने कर्ज घेतले होते. कर्ज फेडण्यासाठी तिला तगादा लावण्यात आला होता. सायबर चोरांकडून कर्जाच्या रकमेसाठी धमकी देण्यात येत होती. कर्जाची रक्कम फेडण्यासाठी आरोपी गौरीने आजीची हत्या करत घरातून आजीचे एक तोळ्याचे मंगळसूत्र आणि ३६ हजार रोख रक्कम चोरली. आरोपी गौरीने २० हजार रुपयांना मंगळसूत्र विकले आणि त्यातील १३ हजार रुपये धमकी देणा-यांच्या खात्यावर जमा केले. या हत्या प्रकरणाचा तपास करणा-या पोलिसांना चौकशी दरम्यान गौरीवर संशय आला. पोलिसांनी गौरीची चौकशी केल्यानंतर तिने हत्या केल्याची कबुली दिली.

मृत सुलोचना डांगे या मंगळवारी घरी एकट्या होत्या. वारजे परिसरात सुलोचना डांगे या त्यांचा मुलगा आणि नातीसह वास्तव्य करत होत्या. त्यांचा मुलगा सुतारकाम करतो. तर, गौरीदेखील नोकरी करते. दोघेही कामाला गेल्याने आजी सुलोचना या घरी एकट्याच होत्या. त्याचा फायदा घेत गौरी आजीची हत्या करत घरातील दागिने आणि पैसे चोरून पसार झाली. भाडेकरू काही कामासाठी त्यांच्या घरी गेले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यावेळी आजी कोसळलेल्या अवस्थेत दिसल्या.

घरात कपाट उघडं आणि वस्तू अस्ताव्यस्त दिसल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. या सगळ्या घटनेच्या चौकशीत वेगवेगळी माहिती पुढे येत होती. पोलिसांना गौरीवर संशय आला. पोलिसांनी गौरीची सखोल चौकशी केली. त्यावेळी गौरीने हत्या केल्याची कबुली दिली.

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
दोन दिवसांपूर्वीही अशाच एका घटनेने पुणे हादरले होते. आजीने घर सोडून जाण्यास सांगितल्यामुळे नातवाने आजीची हत्या केली होती. घर सोडून जाण्यास सांगितले आणि दागिन्यांचा ताबा न दिल्याच्या रागातून २० वर्षांच्या नातवाने वडिलांच्या मदतीने आजीचा खून केला होता. नातवाने आजीच्या शरीराचे तुकडे करून नदीत टाकल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये उघड झाले होते. मुंढवा पोलिसांनी याप्रकरणी कसून चौकशी करत हा गुन्हा उघडकीस आणला. मुंढवा पोलिसांनी नातवाला आणि त्याच्या वडिलांना अटक केली होती. ही घटना ताजी असताना त्याच प्रकारची दुसरी घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या