24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रगणेशोत्सवात श्रीफळाला मोठी मागणी; मुंबई-पुण्यात दररोज २५ लाख नारळांची विक्री

गणेशोत्सवात श्रीफळाला मोठी मागणी; मुंबई-पुण्यात दररोज २५ लाख नारळांची विक्री

एकमत ऑनलाईन

पुणे : दोन वर्ष गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने उत्सवाशी संबंधित सर्वच व्यवसायांच्या आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला होता. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा गणेशोत्सवात पूजा, तोरणांसाठी नारळाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.

‘ पुणे, मुंबई परिसरातच उत्सव कालावधीत दररोज २० ते २५ लाख नारळांची विक्री होत आहे. गणेशोत्सवात नारळ विक्रीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एका नारळाची किंमत २० ते ४० रुपये दरम्यान आहे.

गेले दोन वर्ष गणेशोत्सवावर करोना संसर्गामुळे निर्बंध होते. त्यामुळे उत्सव काळात नारळ विक्रीवर मोठा परिणाम झाला होता. यंदा उत्सवावर निर्बंध नसल्याने नारळ विक्रीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. उत्सवाच्या काळात राज्यात पुणे आणि मुंबई या दोन शहरांत नारळांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. उत्सव सुरू होण्यापूर्वी तीन ते चार दिवस आधी पुण्यातील मार्केट यार्ड तसेच नवी मुंबईतील वाशी बाजारात तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून नारळांची आवक सुरू झाली. नारळांना मागणी वाढली असून दर स्थिर आहेत.

मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज तीन ते साडेतीन हजार पोती नारळांची आवक होत आहे. एका पोत्यात शंभर नारळ असतात. दररोज तीन ते साडेतीन लाख नारळ बाजारात विक्रीसाठी पाठविले जातात. तोरणासाठी नवा नारळ वापरला जातो. तमिळनाडूतून नव्या नारळाची आवक होत आहे. कर्नाटकातून मद्रास आणि सापसोल जातीच्या नारळांची आवक होत आहे. आंध्र प्रदेशातून पालकोल जातीच्या नारळांची आवक होत आहे.

हॉटेल व्यावसायिकांकडूनही मागणी
गणेशोत्सवात भक्तिभावाने भाविक ‘श्रीं’ना तोरण अर्पण करतात. तोरणासाठी तमिळनाडूतील नारळाचा वापर केला जातो. गेले दोन वर्ष तोरणासाठी वापरल्या जाणा-या नव्या नारळाला मागणी कमी होती. यंदा नव्या नारळाच्या मागणीत वाढ झाली आहे. उत्सवाच्या कालावधीत पुणे-मुंबईत भाविक मोठ्या संख्येने येतात. खाद्यपदार्थ विक्रीत मोठी वाढ होते. यंदा उत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने हॉटेल व्यावसायिक, कॅटिरग व्यावसायिक तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून नारळांच्या मागणीत वाढ झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या