21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeराष्ट्रीयपाणी, वीज बिलाच्या विलंब शुल्कावरही जीएसटी

पाणी, वीज बिलाच्या विलंब शुल्कावरही जीएसटी

एकमत ऑनलाईन

केंद्र सरकारचा दणका, रेल्वे, विमान तिकीट रद्द केल्यास जीएसटी भरावा लागणार

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने जीएसटीची व्याप्ती वाढविण्याचा धडाका लावला असून, अन्नधान्यासह दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंसोबत आता आणखी काही भाग जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा धडाका लावला आहे. आता तर पाणी, वीज बिलाच्या विलंब शुल्कावरही जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय रेल्वे, विमान तिकीट रद्द केल्यास जीएसटी भरावा लागणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून विविध वस्तूंवर जीएसटी लागू केल्याने आधीच महागाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. असे असतानाही केंद्र सरकार जीएसटीची व्याप्ती वाढविण्याचा धडाका सुरूच ठेवला आहे. आता तर पाणी आणि वीज बिलाच्या विलंब शुल्कावरही जीएसटी लावला जाणार आहे. तसेच रेल्वे, विमान तिकीट रद्द केले तर त्यावरही जीएसटी लागणार आहे. याशिवाय हॉटेल आणि टूर ऑपरेटर्सकडून करण्यात आलेली बुकिंग आणि तिकीट रद्द केल्यास लागणा-या रद्दीकरण शुल्कावर जीएसटी भरावा लागणार आहे. बुकिंग दरम्यान जीएसटीचे जे दर असतील, त्याच दराने रद्दीकरण शुल्कावर जीएसटी लागेल. मात्र, चेक बाऊन्स झाल्यास लागणा-या दंडावर जीएसटी लागणार नाही.

सीबीआयसीने लोकांच्या मनात संभ्रम असलेल्या अनेक बाबींबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सीबीआयसीने स्पष्ट केले की, आईसक्रीम पार्लरमध्ये ६ ऑक्टोबर २०२१ पासून १८ टक्के जीएसटी लागू आहे. ज्या पार्लरनी ५ टक्के दराने आईसक्रीमवर जीएसटी घेतला आहे. तसेच त्यांनी इनपूट टॅक्स क्रेडिट घेतलेला नाही. त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची वसुली करण्यात येणार नाही किंवा त्यांच्यावर कुठलीही दंडात्मक कारवाई होणार नाही.

आईसक्रीम पार्लरमध्ये जीएसटीबाबत खूप संभ्रमाची स्थिती होती. कारण रेस्टॉरंटमधील भोजनावर ५ टक्के जीएसटी लागते. मात्र, आईसक्रीम पार्लरमध्ये कुठल्याही प्रकारचे खाद्यपदार्थ तयार केले जात नसल्याने त्याला रेस्टॉरंट मानले जात नाही. आईसक्रीम पार्लरच्या जीएसटी दराबाबत खूप वाद निर्माण झाला होता. तसेच अनेक पार्लरना विभागाकडून नोटीस जारी करण्यात आल्या होत्या, तर कुठल्याही प्रकारचे सरकारी नियम जसे की ट्रॅफिकच्या नियमांचे उल्लंघन केल्यास होणा-या दंडाच्या रकमेवर कुठलाही जीएसटी लागणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

५ टक्के जीएसटी
अन् ५० टक्के दरवाढ
देशात दिवसेंदिवस वाढणा-या महागाईमुळे सर्वसामान्य आधीच त्रस्त आहेत. त्यातच दुग्धजन्य पदार्थांवर जीएसटी लागू करण्यात आला आहे. मात्र, काही कंपन्यांनी ५ टक्के जीएसटी लागू झालेला असताना वस्तूंच्या किमतीत तब्बल ५० टक्के वाढ करून ग्राहकांची लूट सुरू केली आहे. दह्याच्या पाकिटावर ५ टक्के जीएसटी लावला आहे, तर दह्याच्या पॉकिटाची किंमत १० रुपयांवरून १५ रुपये केली आहे. म्हणजेच पॉकिटाच्या किमतीत तब्बल ५० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या