मुंबई : डी. वाय. पाटील स्टेडियमवर आज (दि. ११) शफाली वर्मा नावाचे वादळ आले होते. या वादळी तडाख्यात गुजरात जायंट्सचा पार पालापाचोळा होऊन तो हवेत उडून गेला. हा चुराडा शफाली वर्माने केला, तोही अवघ्या 7 षटकात.
शफाली वर्माने १९ चेंडूत अर्धशतकी खेळी केली. आयपीएल २०२३ च्या हंगामातील हे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. शफाली इथर्यंतच थांबली नाही तर तिने दिल्लीला १० विकेट्स अन ७७ चेंडू राखून पराभव केला. दिल्लीने गुजरातचे १०६ धावांचे आव्हान अवघ्या ७.१ षटकात पार केले.
शफाली वर्माने एकटीने २८ चेंडूत ७६ धावा चोपल्या. त्यात १० चौकार आणि ५ षटकारांची आतशबाजी होती. शफाली वर्माने २७१.४३ च्या स्ट्राईक रेटने गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई केली. सलामीवीर शफाली वर्माला कर्णधार आणि सलामीवीर मेग लेनिंगने १५ चेंडूत नाबाद २१ धावा करत चांगली साथ दिली.
तत्पूर्वी आजच्या सामन्यात गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र दिल्लीच्या मारिझाने कापच्या भेदक मा-यासमोर गुजरातला २० षटकात ९ बाद १०५ धावांपर्यंतच मजल मारता आली. गुजरातकडून किम ग्राथने ३२ धावांची झुंजार खेळी केली. मारिझानेने ४ षटकात १५ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. तिला शिखा पांडेने ३ विकेट्स घेत चांगली साथ दिली.