23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeक्रीडाशेवटच्या दोन चेंडूंवर दोन षटकारांसह गुजरात विजयी

शेवटच्या दोन चेंडूंवर दोन षटकारांसह गुजरात विजयी

एकमत ऑनलाईन

बुधवारी इंडियन प्रीमिअर लीग २०२२ मधील ४०व्या गुजरात विरुद्ध हैदराबाद या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरातने शेवटच्या दोन चेंडूंवर दोन षटकार खेचत ५ विकेट्सनी विजय मिळवला. गुजरातचा या हंगामातील हा सातवा रोमहर्षक आणि चित्तथरारक विजय होता. या विजयाचे शिल्पकार ठरले राशिद खान आणि राहुल तेवतिया मात्र, सामनावीरचा पुरस्कार हैदराबादच्या उमरान मलिकला मिळाला. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजीला आलेल्या हैदराबादने ६ बाद १९५ धावा चोपल्या. हैदराबादच्या १९६ धावांचे आव्हान गुजरातने ५ विकेट्स गमावत पूर्ण केले. गुजरातकडून फलंदाजी करताना यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने ३८ चेंडूंत १ षटकार आणि तब्बल ११ चौकारांसह ६८ धावा केल्या.

राहुल तेवतिया आणि राशिद खान यांनीही आतषबाजी केली. तेवतियाने २१ चेंडूंत २ षटकार आणि ४ चौकारांसह नाबाद ४० धावांची उत्तुंग खेळी केली तर राशिदने ११ चेंडूत ४ षटकारांसोबत नाबाद ३१ धावा केल्या. त्यात एका विजयी षटकाराचा समावेश होता. दुसरीकडे, शुभमन गिलने सलामीला २२ धावांचे योगदान दिले. हार्दिक पांड्या (१०), डेव्हिड मिलर (१७), अभिनव मनोहर (०)यांना भरभक्कम योगदान देता आले नाही, पण त्याचा संघावर कोणताही फरक पडला नाही. यावेळी हैदराबादकडून गोलंदाजी करताना एकट्या उमरान मलिकने ४ षटकांत २५ धावांत ५ विकेट्स घेत चमकदार कामगिरी केली त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. उमरान मलिक २२ वर्षे आणि १५७ दिवसांचा असताना आयपीएलमध्ये एका सामन्यात ५ विकेट्स घेणारा दुसरा सर्वांत युवा फलंदाज बनला. या यादीत पहिल्या क्रमांकावरील जयदेव उनाडकटने २१ वर्षे आणि २०४ दिवसांच्या वयात ही कामगिरी केली होती. त्यानंतर तिस-या क्रमांकावर अर्शदीपने २२ वर्षे आणि २२८ दिवसांच्या वयात एका आयपीएल सामन्यात ५ विकेट्स घेतल्या होत्या.

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि अ‍ॅडेन मार्करम याने तिस-या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. अभिषेकने ४२ चेंडूंत ३ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ६५ धावा केल्या. तसेच, मार्करमने ४० चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५६ धावा केल्या. कर्णधार केन विल्यम्सन (५), राहुल त्रिपाठी (१६), निकोलस पूरन (३), वॉशिंग्टन सुंदर (३), मार्को जेन्सन (८), शशांक सिंगला (२५ )धावांची खेळी करता आली. गुजरातकडून मोहम्मद शमीने ४ षटकांत ३९ धावांत ३ विकेट्स घेत सर्वोत्तम गोलंदाजी केली. यश दयाल आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी १ विकेट खिशात घातली.

गुजरातला विजयासाठी अखेरच्या दोन चेंडूंवर ९ धावांची गरज होती. त्यावेळी हैदराबादचा संघ हा सामना जिंकेल, असे वाटत होते. पण राशिद खानने अखेरच्या दोन्ही चेंडूंवर षटकार लगावले आणि संघाला ५ विकेट्स राखून रोमहर्षक विजय मिळवून दिला. धडाकेबाज खेळीनंतर गुजरात जिंकेल, असे कोणाला वाटत नव्हते. पण राशिद आणि राहुल तेवातिया यांनी अखेरच्या षटकात २५ धावा फटकावत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह गुजरात टायटन्स गुणतालिकेत पुन्हा एकदा टॉपवर आला आहे. तर सनरायझर्स हैदराबाद संघ तिस-या स्थानावर आहे.

डॉ. राजेंद्र भस्मे
कोल्हापूर

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या