लातूर : प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारमार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत़ त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करीत असतानाच जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासनाच्या वतीने अधिकच्या उपाययोजना करून गर्दी कशी रोखता येईल यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे़ त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण गंज गोलाई लॉक करण्यात आली आहे त्यामुळे आता गंज गोलाईत एकही वाहन प्रवेश करणार नसून आठवड्यातील त्या त्या दिवशी ठरवून दिल्यानुसार त्या त्या आस्थापना सुरू राहतील व नागरिक गोलाईत पायी जाऊन खरेदी करतील, अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये जिल्ह्याच्या नागरी व शहरी भागाकरिता दि़ २३ मार्चपासून प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या कलमान्वये पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र अकारण फिरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत़ लॉकडाऊनमुळेही सर्व प्रकारच्या आस्थापन, व्यवसाय, दुकाने पूर्णत: बंद होती मात्र लॉकडाऊन-३ च्या शेवटच्या चरणात म्हणजेच ४ मेनंतर लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली़ त्यामुळे बाजारपेठेत एकच गर्दी होत होती. ही गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने
आठवडाभराचे वेळापत्रक जाहीर केले़ त्या वेळापत्रकानुसारच ती दुकाने गेल्या आठवड्यापासून सुरू ठेवली जात आहेत; परंतु, हे करीत असताना अनावश्यक गर्दी मोठ्या प्रमाणात होत होती. ही गर्दी टाळण्याचे मोठे आवाहन प्रशासनासमोर होते.
Read More सोलापुरात कोरोनाचा वाढता उद्रेक
गंज गोलाई व परिसरातील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण गंज गोलाईच लॉक करून टाकली आहे़ मेन रोड, कापड लाईन, भुसार लाईन, जुनी कापड लाईन, मस्जिद रोड, मस्जिद रोड-२, त्या लागून असलेले २ रस्ते, गोलाई पूर्व रस्ता, त्याला लागून असलेले ३ रस्ते, शिवाजी मार्ग, मलंग गल्ली, सराफ लाईन, लोखंड गल्ली अशा १६ रस्त्यांवर बॅरिकेटींग करण्यात आली आहे शिवाय या १६ रस्त्यांच्या अंतर्गत रस्तेही बंद करण्यात आले आहेत़ चारचाकी, तीनचाकी तर सोडा दुचाकीही या रस्त्यांवरून प्रवेश करणार नाहीत, अशी व्यवस्था करण्यात आली आहेत त्यामुळे गंज गोलाईतील वाहनांची वर्दळ आपोआप आटोक्यात आली असल्याने गर्दीवर नियंत्रण आले आहे़
इतिहासात पहिल्यांदाच गंज गोलाई लॉक
गंज गोलाईला एक इतिहास आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यापासून ते हैदराबाद मुक्तीसंग्रामापर्यंतच्या सर्व घडामोडींची मूक साक्षीदार गंज गोलाई आहे़ गंज गोलाईच्या स्थापनेला १०० वर्षेही पूर्ण झाली आहेत़ अशा या ऐतिहासिक वास्तूने अनेक घडामोडी पाहिल्या आहेत़ आज सर्वत्र कोरोनाचे सावट आहे़ गर्दी टाळणे, मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्स पाळणे आवश्यक आहे त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच गंज गोलाई लॉक करण्यात आली आहे़