नवी दिल्ली : कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या १०९ किलोग्रॅम वजनी गटात भारताचा गुरदीप सिंहने कांस्यपदक जिंकले आहे. दरम्यान, त्याने स्नॅचमध्ये १६७ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये २२३ किलोग्रॅम असे एकूण ३९० किलो वजन उचलून बर्मिंगहॅममध्ये भारताचा तिरंगा फडकावला. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत १८ पदकांवर झडप घातली आहे.
इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. स्पर्धेच्या सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी भारताने ५ पदकांची कमाई केली. यामध्ये चार कांस्य आणि एका रौप्यपदकाचा समावेश आहे. यासह भारताच्या एकूण पदकांची संख्या १८ वर पोहोचली आहे. ज्यात पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि सात कांस्य पदकांचा समावेश आहे. एवढेच नाही तर भारताने तीन पदकेही निश्चित केली आहेत, म्हणजेच येत्या काही दिवसांत भारताच्या पदसंख्येत आणखी वाढ होणार आहे.