24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रघाईघाईत हनिमून केला, पण लग्नच करायचे राहिले; शिवसेनेची टीका

घाईघाईत हनिमून केला, पण लग्नच करायचे राहिले; शिवसेनेची टीका

एकमत ऑनलाईन

मुंबई : सततचे दौरे, अपुरी झोप या सगळ्या कारणांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सध्या थकवा आला असून ते आजारी पडले आहेत. यावरूनच आता ‘सामना’च्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. तसेच आपण घाईघाईने मधुचंद्र तर केला, पण लग्नच करायचं विसरलो, अशी शिंदे गटाची अवस्था झाल्याची टीका या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून राज्याची राजकीय प्रकृती बिघडलीच होती, पण ज्यांच्या फुटीरतेच्या किंवा विश्वासघाताच्या डायरियामुळे राज्याची प्रकृती खालावली, ते मुख्यमंत्री शिंदेही आजारी पडल्याचं वृत्त अलिबाबा आणि चाळीस चोरांसाठी चिंताजनक आहे. मनुष्यप्राणी व त्याचे शरीर म्हणजे एक यंत्र आहे. त्यात अधूनमधून बिघाड होणारच, पण शिंदे हे किमान २०-२२ तास न झोपता काम करतात. त्यांच्या कामाचा उत्साह दांडगा आहे.

कोणताही व्हायरस त्यांच्या अवतीभोवती फिरत नाही, तरीही मुख्यमंत्री आजारी पडावेत, हे त्या चाळीस जणांसाठी चिंताजनक आहे, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे. या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, उद्धव ठाकरेंचा राज्यव्यापी दौरा आता सुरू होईल, राज्याचा माहोल बदलण्याची क्रिया सुरू होईल. त्यानंतर उडालेला धुरळा पाहून आजचा आजार जास्तच बळावेल व कितीही जादूटोणा केला तरी कोणाला रोखता येणार नाही.

पुन्हा ८ ऑगस्टला न्यायालयात सत्य आणि इमानदारीचाच विजय होईल. मुळात अलिबाबा व चाळीस चोरांची बाजू कायद्याने आणि नीतीने खरी असती तर एव्हाना संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला असता. शपथविधी नाही व शिंदे-फडणवीसांच्या फक्त दिल्ली वा-याच सुरू आहेत. गुरुवारी तर उपमुख्यमंत्री फडणवीस एकटेच दिल्लीला गेले.

इकडे मुख्यमंत्री शिंदे अचानक आजारी पडले. एकतर शिंदेंना दिल्लीची हवा मानवत नाही किंवा महाराष्ट्राची हवा पुन्हा बिघडली असल्याने शिंदेंना गुदमरल्यासारखे झाले असावे. लग्न झाल्यावर पाळणा हलला नाही की लोक संशयाने पाहतात आणि दाम्पत्याला सल्ले देतात. मुख्यमंत्रिपदाची वरमाला बळेबळे गळ्यात घालून घेतली, पण मंत्रिमंडळ जन्माला येत नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीसांच्या मधुचंद्रावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

‘पक्ष सोडला नाही तर पक्षांतर बंदी का? या प्रश्नाचे उत्तर शोधताना शिंदे यांचंच डोकं ठणकत राहील व एक दिवस त्यांना डोक्यावरचे केस उपटत बसावे लागेल. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा फैसला आता जवळ आला आहे. या प्रकरणात काय घडले की, आपण घाईघाईने मधुचंद्र तर केला, पण लग्नच करायचं विसरलो, अशी शिंदे गटाची अवस्था झाली आहे. त्यांना आता मळमळत आहे, गरगरत आहे. क्रांतीच्या वल्गना केल्या व आता भीतीपोटी वांती सुरू झाली. शिंदे यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या चाळीस समर्थकांसाठी हा शुभशकून नाही. औटघटकेच्या सरकारसाठी स्ट्रेचर व अँब्युलन्स तयार ठेवायला हवी. शिंद्यांनी लवकर बरे व्हावे, त्यांना बरेच काही पाहायचे आहे. ईश्वर त्यांना ते सर्व पाहण्याचे बळ देवो’,
असेही अग्रलेखात म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या