सर्वोच्च न्यायालयाचे मोठे वक्तव्य
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर केला. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाला मोठा धक्का देत शिंदेंना दिलासा दिला आहे. त्यामुळे आता हे स्पष्ट होतेय की, राज्यातील शिंदे सरकार बचावले आहे आणि त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्चीही. याबाबत निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने मोठे वक्तव्य केले. उद्धव ठाकरे यांनी स्वखुशीने राजीनामा दिला, त्यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार पुन्हा आणले असते, असे सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल जाहीर करताना म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर घटनापीठ काय निकाल देणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. घटनापीठाने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या सर्व आमदारांच्या कृतीवर ताशेरे ओढले, पण घटनापीठाने आमदार अपात्र ठरवण्याचा निर्णय अध्यक्षांकडे सुपुर्द केला आणि शिंदे सरकार वाचले.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आणखी महत्त्वाचे भाष्य केले की, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर त्यांचं सरकार परत आणलं असतं. त्यामुळे सगळं सगळं चुकलं, पण शिंदे सरकार वाचलं, हाच या निकालाचा अर्थ आहे.
सत्तासंघर्षाच्या निकालाचे वाचन करताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायला नको होता. त्यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांचे सरकार परत आणले असते.