24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeआनंदघनाचे आनंदगाणं!

आनंदघनाचे आनंदगाणं!

एकमत ऑनलाईन

कोरोनाने अवघ्या जगावर चिंतेचे, नैराश्याचे, अनिश्चिततेचे मळभ दाटून आलेले आहेत़ मानवी आरोग्यावर तर संकट आहेच पण मानवी उपजीविकेवरही कोरोनाने मोठे संकट निर्माण केलेले आहे़ कोरोनावर औषध नाही, उपचार नाही की, प्रतिबंधात्मक लस नाही़ अशी लस शोधण्यासाठी जगातले सर्व शास्त्रज्ञ, संशोधक प्रयत्न करतायत पण त्यास ठोस यश मिळाल्याची वार्ता नाही़ जरी अशी वार्ता आली तरी प्रत्यक्षात ही लस बाजारात येण्यासाठी किमान दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणे अटळच! त्यामुळे सध्या तरी लॉकडाऊनचा प्रतिबंधात्मक उपायच जगभर वापरला जातो आहे़ अर्थात हा उपाय भारतासारख्या विकसनशील व महाप्रचंड लोकसंख्या असलेल्या देशासाठी अजिबात न परवडणाराच! कारण या पर्यायाने देशातील हातावर पोट असणा-या कोट्यवधी लोकांचे जगण्याचे साधनच उद्ध्वस्त केले आहे़ शिवाय उद्योगधंदे, व्यवसाय आदींना जबरदस्त फटका दिला आहे.

अर्थचक्र पूर्णपणे ठप्प झाल्याने कोट्यवधी लोकांना रोजगार गमवावे लागले आहेत़ शिवाय या संकटाच्या तडाख्याने व लॉकडाऊनने निर्माण झालेल्या परिस्थितीने सैरभैर झालेल्या कोट्यवधी मजुरांनी घर जवळ करण्यातच सुरक्षितता मानल्याने देशात फाळणीनंतरचे सर्वांत मोठे स्थलांतर घडले़त्यामुळे आता सरकार उद्योगचक्र सुरू करण्यास धाडसाने तयार झाले असले तरी गावाकडे गेलेले मजूर इतक्यात तरी शहरांत कामावर परतण्याची शक्यता खूपच कमी आहे आणि त्यामुळे मनुष्यबळाच्या या तुटवड्यामुळे उद्योगधंदे, व्यवसायाची व एकंदर अर्थचक्राची चाके कोरोनापूर्वीच्या काळाप्रमाणे वेगाने फिरण्याची शक्यता एवढ्यात तरी नाहीच! शिवाय कोरोनाचा धोका अद्याप कायमच आहे़ उलट तज्ज्ञांच्या मते पावसाळ्यात कोरोनाच्या साथीचा खरा साथसंसर्ग सुरू होऊन देशात या साथीचा उद्रेक होण्याची व रुग्णांची संख्या ६५ लाखांवर जाण्याची शक्यता आहे.

Read More  खासगी रुग्णालये तत्काळ सुरू करावीत – आरोग्य मंत्री राजेश टोपे

मात्र, तरीही मोदी सरकारने लॉकडाऊन कायम ठेवण्याचा व तो आणखी कडक करण्याचा आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला बाजूला ठेवून देश अनलॉक करण्याचा व्यवहारी शहाणपणा स्वीकारला आहे़ हे खरे तर मोठे धाडसच! मात्र, सरकारकडे हे धाडस करण्याशिवाय दुसरा मार्गच शिल्लक राहिलेला नाही़ कारण आता आणखी जास्त काळ देशातील जनतेला ठाणबंद करून ठेवणे परवडणारे तर नाहीच पण शक्यही नाही, हे सरकारला कळून चुकलेय! असो!! मूळ मुद्दा हा की, जरी सरकारने देश अनलॉक करण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली असली तरी कोरोनाने जगाची व जगण्याची जी सगळी रीतच बदलून टाकलीय त्यात आजवर देशाच्या अर्थव्यवस्थेची चाके वेगाने फिरवणाºया क्षेत्रांची उद्या ती क्षमता राहील का? याबाबत तज्ज्ञांना शंका आहेत़ कोरोनासह जगताना या क्षेत्रांमध्ये जर ही क्षमता निर्माण झाली नाही तर मग देशाला कोणते क्षेत्र तारणार? असाच प्रश्न सध्या देशासमोर आहे व तज्ज्ञांच्या मते त्याचे उत्तर हे कृषी क्षेत्र आहे.

त्यामुळे सगळ्यांच्या नजरा सध्या या क्षेत्राकडे लागल्या आहेत़ तथापि, कोरोनाच्या संकटाने जसे आपल्या देशातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्राच्या अवस्थेचे व क्षमतेचे वाभाडे काढले आणि देशाच्या धोरणकर्त्यांच्या धोरणांचे वस्त्रहरण करून ते वेशीवर टांगले अगदी तसाच प्रकार कृषी क्षेत्राबाबतही होण्याची दाट शक्यता आहे़ कारण भाषणात एकीकडे कृषिप्रधान देश म्हणून मोठमोठ्या बाता ठोकायच्या आणि प्रत्यक्षात कृती, धोरणे मात्र उद्योगधार्जिणी व शेतीकडे साफ दुर्लक्ष करणारीच, असेच देशातील आजवरचे चित्र राहिलेले आहे़ त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यानंतर सात दशके उलटूनही देशातला शेतकरी शेतीसाठी हक्काचे पाणी, अखंडित वीज, बाजारपेठ व शेतमालाला योग्य दर यासाठी तडफडतो आहे़ त्याच्या या मूलभूत गरजांची पूर्तता करून शेतीला उद्योगाचा दर्जा देणे, तसे धोरण राबविणे तर लांबच पण धोरणकर्ते शेती बेभरवशाचीच आहे, तिच्यावर अवलंबून न राहता जोडधंद्यांकडे वळा, शेतीवरचा भार कमी करा, असे सल्ले देण्यात धन्यता मानतात़ धोरणकर्त्यांच्या या उदासीन दृष्टिकोनामुळे सध्या देशात शेती आतबट्ट्याचा धंदा बनलाय व या नैराश्यातून देशात शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्रच सुरू झाले.

Read More  महसूल वाढविण्यासाठी एसटी महामंडळाकडून अनेक पर्यायांवर विचार सुरु

मात्र, कर्जमाफीच्या तात्पुरत्या मलमपट्टीशिवाय धोरणकर्त्यांना वेगळे काही करावेसे वाटतच नाही! आता कोरोनाच्या या संकटाने निर्माण केलेल्या परिस्थितीत देशाला व देशाच्या धोरणकर्त्यांना याच कृषी क्षेत्राकडे तारणहार म्हणून बघण्याची वेळ यावी हा काव्यगत न्यायच म्हणावा लागेल! असो!! देशातील शेती ही आजही पावसावर व निसर्गाच्या लहरीवरच अवलंबून आहे, हेच वास्तव़ त्यामुळे मान्सूनच्या वार्तेकडे देशातील शेतकरीच नव्हे तर संपूर्ण देशच कान लावून बसलेला असतो़ सध्याच्या कोरोनाच्या संकटात तर मान्सूनच्या आगमन वार्तेची केवळ प्रतीक्षाच नाही तर प्रचंड धाकधूकही होती़ मागच्या वर्षी काही भागांत अतिवृष्टीचे रौद्र तांडव तर दुस-या भागांमध्ये साफ खप्पामर्जी असे दुहेरी रूप पावसाने दाखवले व सगळ्यांची सत्वपरीक्षाच घेतली होती.

मात्र, अखिल मानवजात संकटात असताना निसर्ग कृपाळू बनला आहे़ मान्सूनच्या आनंदघनांनी आनंदगाणं गायिले आहे़ अगदी नियोजित वेळी म्हणजे १ जूनला मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले आहे व तो मनसोक्त बरसला आहे़ अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनने वेगही पकडला असून हा वेग कायम राहिल्यास तो येत्या दोन-तीन दिवसांत तळकोकणातून महाराष्ट्रात दाखल होईल़ हवामान खात्यानेही मान्सूनचा सुधारित दुसरा अंदाज व्यक्त करताना यावर्षी देशात सर्वत्र विनाअडथळा सरासरीइतका म्हणजे १०२ टक्के पाऊस होईल, असे भाकित वर्तविले आहे़ सध्या संकटाच्या गर्तेत सापडलेल्या बळिराजासाठी व देशासाठीही ही आनंदवार्ताच आहे़ यावर्षी देशात अल्-निनोचाही फारसा प्रभाव राहणार नाही, असे भाकितही हवामान खात्याने वर्तविले आहे.

हा बळिराजासाठी दुग्धशर्करा योगच! मागच्या दोन-तीन वर्षांपासून मान्सूनच्या लहरीपणाने शेतकºयांना दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व गारपिटीच्या संकटांना सामोरे जावे लागते आहे़ त्यात कोरोना संकटाने अवघा देश ठप्प केल्याने शेतकºयांना नेमके पीक पदरात पडण्यावेळीच जबरदस्त आर्थिक फटका व नुकसान सहन करावे लागले आहे़ अशा सगळ्या मळभ दाटलेल्या स्थितीत मान्सूनचे आनंदघनाचे आनंदगाणं सर्वांनाच मोठा दिलासा देणारे, मरगळलेल्या मनाला उभारी देणारे, पुन्हा उठून उभे राहण्याचे बळ देणारेच आहे़ हवामान खात्याचा अंदाज कुठलेही विघ्न, अडथळा न येता खरा ठरो व देशावर दाटलेले मळभ सृष्टीच्या नवचैतन्यदायी रूपाने दूर होवो, हीच मनोमन प्रार्थना! त्याचवेळी हा आनंदघन आपल्या आगमनाने कोरोनाचे संकट वाढण्याची जी भीती व्यक्त होतेय ती धुऊन टाकेल, हे मळभही साफ करेल, हीच आशा व मनोमन प्रार्थना!

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या