27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeहेडलाईन मॅनेजमेंट!

हेडलाईन मॅनेजमेंट!

एकमत ऑनलाईन

कोरोनाच्या संकटाने देशात आरोग्य आणीबाणीबरोबरच आर्थिक आणीबाणीही आणली़ केवळ देशावरच नव्हे तर जगावर कोरोना जागतिक महामारीबरोबरच आर्थिक आरिष्ट्यही कोसळले आहे़ जगातला प्रत्येक देश आपापल्या परीने या कैकपदरी संकटाशी झुंजतो आहे़ टाळेबंदी व जनतेला ठाणबंद करणे हाच कोरोनाच्या संसर्गाचा वेगवान प्रसार रोखण्याचा एकमेव ज्ञात पर्याय असल्याने जगातील सर्वच देशांना तो लवकर असो की, उशिरा, वापरणे भाग पडले़ हा पर्याय स्वीकारताना ज्यांनी त्याचे होणारे परिणाम ताडण्याची आकलनशक्ती दाखविली त्या देशांना अर्थातच कमी आर्थिक फटका बसला.

Read More  उघडू शकतात शॉपिंग मॉल, सिनेमा हॉल

मात्र, ज्यांनी या पर्याय वापराच्या परिणामाची चिंताच करण्याचे कष्ट घेतले नाहीत त्या देशांना जबरदस्त आर्थिक फटका बसणे अटळच! दुर्दैवाने आपला देश दुस-या वर्गात मोडतो़ त्याचे चटके व होरपळ आता देशात चौथ्या टप्प्याचा लॉकडाऊन लागू झाल्यानंतर संपूर्ण देश सोसतो आहे़ कोणता वर्ग सुपात आहे तर कोणता जात्यात, हाच काय तो फरक! यामुळे झालंय काय की, रोगापेक्षा उपचार भयंकर, अशी स्थिती आज देशात आहे़ लॉकडाऊन चौथ्या टप्प्यात वाढवला गेला तरी कोरोना रुग्णांची संख्या वाढता वाढता वाढेच आहे आणि दुसरीकडे लॉकडाऊनच्या पर्यायाचा अविचारी वापराने एवढी भयंकर स्थिती देशात निर्माण झालीय की, रोगापेक्षा लोकांना आत भूकबळी ठरण्याची चिंता, भय ग्रासून टाकतेय! जगभरात अशी स्थिती निर्माण झाल्यावर अनेक देशांच्या राज्यकर्त्यांनी लोकांना थेट रोख मदत करत त्यांना दिलासा देण्याचा मार्ग स्विकारला़ त्यामुळे आपल्या देशाच्या राज्यकर्त्यांकडूनही तशीच अपेक्षा व्यक्त होऊ लागली.

Read More  पहिल्याच दिवशी बाजारात ग्राहकांची गर्दी

कोरोनाच्या अगोदरही देशाची अर्थव्यवस्था सुसाट, सशक्त वगैरे नव्हतीच! तिची प्रकृती तोळामासाच होती़ मात्र, कोरोनानंतर आता ती थेट आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर आहे व आचके देते आहे़ त्यामुळे जेव्हा पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला संबोधून केलेल्या भाषणात ‘आत्मनिर्भर भारता’चा मंत्र जनतेला देताना २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता़ अर्थातच ती घोषणा त्या दिवशी केवळ भारतातील नाही तर जगभरातील प्रसार माध्यमांची हेडलाईन तर ठरलीच पण अनेक अर्थतज्ज्ञांसाठी प्रचंड कुतूहलाचा विषयही ठरली कारण भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती पाहता मोदी सरकार कोणती जादू करून ही किमया पार पाडणार, हाच प्रश्न सर्वांना पडला होता.

Read More  दिल्लीत सार्वजनीक वाहतुकीला परवानगी

मोदी यांनीच भाषणात स्पष्ट केल्याप्रमाणे अर्थमंत्र्यांनी सलग पाच दिवस मॅरेथॉन पत्रपरिषदा घेऊन पाच टप्प्यात हे पॅकेज विस्ताराने जाहीर केले़ पूर्ण पॅकेजची सविस्तर माहिती तपशीलवार समोर आल्याशिवाय व त्याचे सर्वांगाने आकलन झाल्याशिवाय त्यावर भाष्य करणे घाईचे व अयोग्यच! त्यामुळे तिस-या लॉकडाऊनच्या मुदतीचा शेवटचा दिवस असलेल्या रविवार, १७ मे २०२०च्या अर्थमंत्र्यांच्या पाचव्या टप्प्याच्या पत्रकार परिषदेची प्रतीक्षा करणे हे भागच! आता या पॅकेजची होणारी चिकित्सा ही मोदी सरकार व त्यांचे भक्त यांच्यासाठी आक्षेपार्ह असण्याचे कारण नाही! तसे अर्थमंत्र्यांनीही त्यांना प्रश्न विचारणा-या पत्रकारांना व शंका उपस्थित करणा-या विरोधकांना सुनावलेलेच आहे़ असो! तर पाच टप्प्यात जाहीर करण्यात आलेल्या या ऐतिहासिक पॅकेजचा ताळेबंद हा की, कोरोनाच्या महाप्रचंड संकटावर मात करण्यासाठी व पंतप्रधानांच्या दाव्यानुसार या संकटाचे संधीत रुपांतर करून भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी जे २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे त्यात सरकारी तिजोरीतून खर्च होणारी थेट रक्कम ही १़३० लाख कोटी एवढी होते़ मग पॅकेजची एकूण रक्कम २० लाख कोटींची कशी? याचे उत्तर म्हणजे अनेक जुने मुद्दे, घोषणा, योजना व अनेक नव्या सुंदर स्वप्नरंजनाच्या घोषणा यांची बेमालूम सरमिसळ करत गाठोड्याचा आकार प्रचंड मोठा करून टाकण्याचे मोदी सरकारचे जबरदस्त कौशल्य!

Read More  अहमदाबादेत पुन्हा पोलिसांवर दगडफेक

शिवाय या गाठोड्याचे खुबीने व रंगतदार पद्धतीने सादरीकरण करून सर्वकाही जादूई पद्धतीने घडेल हे सांगण्याची, असे गोडगोड स्वप्न सत्यात उतरणारच हे जनतेच्या गळी उतरवण्याची मोदी सरकारची जबरदस्त हातोटी! मागच्या सहा वर्षांत देशातील जनतेने मोदींच्या या अफाट कौशल्याचा पुरेपूर अनुभव घेतलेलाच आहे आणि हेडलाईन मॅनेजमेंटच्या त्यांच्या अफलातून कसबीसमोर केवळ देशच नव्हे तर अवघे जग नतमस्तक झाले आहे!

Read More  स्थानिक स्पर्धांना प्राधान्य द्यावे!

त्यांच्या या क्षमतेला देशाने झुकून सलाम केला आहे़ कोरोनापूर्वीच अर्थव्यवस्थेने मान टाकल्याने अर्थमंत्र्यांनी व रिझर्व्ह बँकेने उद्योगांच्या, बँकांच्या व वित्तीय संस्थांच्या मदतीसाठी जे पॅकेज जाहीर केले होते त्याची एकत्रित बेरीज केली तर तो जवळपास १० लाख कोटींच्या आसपास जाते़ त्यात ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना’ असे भारदस्त नाव देऊन अगोदरच जाहीर करण्यात आलेले १़७० लाख कोटींचे पॅकेज जोडावे लागेल़ ही सगळी बेरीज २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजच्या अर्ध्याहून अधिक रक्कमेची होते़ त्यात या पॅकेजचा भाग म्हणून ज्या नव्या थाटाने घोषणा विविध क्षेत्रासाठी करण्यात आल्या त्यातील बहुतांश घोषणा व त्याची आर्थिक तरतूद फेब्रुवारीत मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पाचाच भाग असलेल्या! त्यात सार हेच की, या घोषणांची अंमलबजावणी होणार, हे सरकारने पुन्हा एकवार ठासून सांगितले!

Read More  रोहित शर्मा बायकोसाठी भावूक

उदाहरणच द्यायचे तर पॅकेज अंतर्गत कृषी क्षेत्रासाठी ज्या घोषणा झाल्या आहेत त्यातील दीड लाख कोटींच्या योजना या अगोदरच अर्थसंकल्पात मांडण्यात आलेल्या व तरतूद करण्यात आलेल्या घोषणा आहेत! थोडक्यात काय तर पॅकेजच्या नावावर अर्थसंकल्पातील पूर्वीच्याच घोषणांची पुन्हा नव्याने घोषणा जंत्री, ती ही ‘डंके की चोट पे’! मग या पॅकेजमध्ये शिल्लक राहिले काय? या प्रश्नाचे उत्तर शोधले तर हेच की, सरकार तुम्हाला वाढीव कर्ज द्यायला वित्तीय संस्थांना सांगणार, तुमची पत व ऐपत असेल तर ते तुम्ही प्राप्त करा, कर्ज मिळवा आणि ते फेडत फेडत स्वत:ही ‘आत्मनिर्भर’ व्हा व देशालाही आत्मनिर्भर करा!

Read More  देशासाठी बंदुक हातात घेईन : हरभजन

आता प्रश्न असा की, कोरोनापूर्वीची देशाची आर्थिक स्थिती पाहता ही तरतूद तर करावीच लागणार होती़ मग कोरोनासारख्या गलीतत्राण करून टाकणाºया भयंकर संकटानंतर जनतेला थेट दिलासा म्हणून प्रत्यक्षात सरकारने त्यांच्या झोळीत काय टाकले? तर गरिबांना दोन महिने मोफत धान्य व जनतेसाठी ‘विश्वगुरू’ बनू पाहणाºया आत्मनिर्भर भारताचे मनमोहक, सुंदर स्वप्नरंजन! मग या पॅकेजची महाचर्चा का? या प्रश्नाचे उत्तर हेच की, मोदी यांचे हेडलाईन मॅनेजमेंटचे अफाट कौशल्य व त्यापुढे नतमस्तक देश, जनता व जग! बाकी हे पॅकेज म्हणजे दारूही जुनी, बाटलीही जुनी आणि त्याचे लेबलही जुनेच, हे मात्र निश्चित!

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या