22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयसत्तासंघर्षावर आज सुनावणी

सत्तासंघर्षावर आज सुनावणी

एकमत ऑनलाईन

अखेर मुहूर्त ठरला, न्या. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय घटनापीठ
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी कधी होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. अखेर आज अखेर सुनावणीचा मुहूर्त ठरला असून, न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय घटनापीठाची स्थापना केली. आता हे घटनापीठ उद्या बुधवार, दि. ७ सप्टेंबर रोजी सुनावणी घेणार आहे. सकाळी १०.३० वाजता सुनावणी सुरू होईल. त्यामुळे आता या सत्तासंघर्षावर नेमका काय निर्णय होणार, याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत.

सत्तासंघर्षावरील सुनावणासाठी स्थापन करण्यात आलेल्या घटनापीठामध्ये न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. नरसिंहा यांचा समावेश असणार आहे. घटनापीठ स्थापन करताना सरन्यायाधीश उदय लळित यांनी यात स्वत:चा समावेश केलेला नाही. त्यामुळे सुनावणीदरम्यान ते घटनापीठाचा भाग असणार नाहीत. यावर उद्या लगेचच सुनावणी होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष असून, पहिल्या दिवशी नेमक्या कोणत्या मुद्याचा विचार केला जाणार, यावर नजर असणार आहे.

उद्या निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबाबत सुप्रीम कोर्टाची भूमिका ठरण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर हे घटनापीठ नियमित कधीपासून कामकाज करणार हे स्पष्ट होईल. सरन्यायाधीश उदय लळीत यांनी ५ सदस्यीय खंडपीठाचे गठन केले. हे ५ सदस्यीय खंडपीठ उद्या सकाळी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या याचिकांवर सुनावणी घेईल.

केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील कार्यवाही शिवसेनेकडून लांबवली जात असल्याचा आरोप करत घटनापीठापुढील सुनावणीसाठी शिंदे गटाने आज सरन्यायाधीशांना विनंती केली होती. त्यासंदर्भात एक रिट याचिकाही दाखल केली होती. या याचिकेत शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि खरी शिवसेना याबद्दल तात्काळ सुनावणी घेऊन निवडणूक आयोगाला कार्यवाही करण्यापासून रोखू नये, त्यांचा मार्ग मोकळा करावा, अशी विनंती केली. याची दखल घेऊन सरन्यायाधीश उदय लळीत यांनी उद्या लगेचच घटनापीठ स्थापन करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, लगेचच कार्यवाही करीत आज सरन्यायाधीशांनी पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन केले. त्यामुळे आता सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला.

सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटातील १६ आमदारांची अवैधता आणि त्या अनुषंगाने शिंदे-फडणवीस सरकारची वैधता ठरवण्यासंदर्भातील अनेक प्रकरणांचे निकाल प्रलंबित आहेत. २३ ऑगस्टला या प्रकरणाची शेवटची सुनावणी झाली होती. मात्र, त्यानंतर या सुनावणीबाबत सातत्याने पुढील तारखा देण्यात आल्या. परंतु आता यावर उद्या सुनावणी सुरू होत असल्याने या प्रकरणाची दिशा स्पष्ट होणार आहे.

हे आहे ५ सदस्यीय घटनापीठ
-न्या. धनंजय चंद्रचूड
-न्या.एम. आर. शहा
-न्या. कृष्ण मुरारी
-न्या. हिमा कोहली
-न्या. पी नरसिंहा

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या