24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रकोल्हापुरात मुसळधार पाऊस, कोकणात जाणारे दोन्ही मार्ग बंद

कोल्हापुरात मुसळधार पाऊस, कोकणात जाणारे दोन्ही मार्ग बंद

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : राज्यात सध्या मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. तर काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात देखील तुफान पाऊस कोसळत आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, या पावसामुळे कोल्हापुरातून कोकणात जाणारे दोन्ही मार्ग बंद झाले आहेत. वाहतुकीवर परिणाम झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे.

मुसळधार पावसामुळे सकाळी कोल्हापूर जिल्ह्यातून गगनबावडा मार्गे कोकणात जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. लोंगे-किरवे या गावच्या हद्दीत पाणी रस्त्यावर आल्याने ही वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यानंतर आता कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. केर्लीजवळ पाणी आल्याने रत्नागिरीला जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. गगनबावडानंतर कोकणात जाणारा दुसरा मार्ग देखील बंद झाला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोल्हापुरातही पावसाची संततधार सुरू असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगेची पातळी ४० फुटांवर गेली आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली आहे.

राधानगरी पाणलोट क्षेत्रासह, आजरा, गगनबावडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. परिणामी राधानगरी धरणही शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. राधानगरी धरणातून भोगावती नदीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील एकूण ५ राज्यमार्ग आणि २१ जिल्हा मार्ग बंद
मुसळधार पावसाने गगनबावडा घाटातून कोकणात जाणारी वाहतूक सध्या बंद ठेवण्यात आली आहे. लोंगे किरवे कुंबी नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने ही वाहतूक बंद ठेवावी लागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ५ राज्यमार्ग आणि २१ जिल्हा मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. मुसळधार पावसाने शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षाही पुढे ढकलल्या आहेत. आज आणि उद्या होणा-या परीक्षांची आता नवी तारीख काही दिवसांत जाहीर होणार आहे.

राज्यातील मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांतही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या