मुंबई: ‘निसर्ग’ वादळानंतर आता राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचं थैमान सुरु आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर गेल्या अनेक तासांपासून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या मुसळधार सरी बरसत आहेत. तसंच अद्यापही अनेक ठिकाणी अद्यापही सोसाट्याचा वारा सुरु आहे. दरम्यान, याबाबत हवामान खात्याने कालच इशारा दिला होता.
सध्या मुंबईसह जवळच्या परिसरात मोठया प्रमाणात पाऊस बरसत आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याचंही दिसत आहे. याशिवाय मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्पलॅक्स (बीकेसी) मध्ये उभारण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने येथील बरंच नुकसान झालं आहे. मात्र, पालिका प्रशासनाने येथील सर्वच रुग्णांना वेळीच सुरक्षित स्थळी हलवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
दरम्यान, पालघर आणि परिसरात पावसाने पहाटेपासूनच जोरदार हजेरी लावली आहे. दुपारी १२ वाजता समुद्रालाही उधाण येणार असल्याचं समजतं आहे. त्यातच पावासाचा आणखी जोर वाढणार आहे. दुसरीकडे ठाणे जिल्ह्याला पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. एकीकडे कालच येऊ गेलेल्या चक्रीवादळातून नागरिक अद्याप सावरलेले नसताना आता पावसाने हाहाकार उडवला आहे.
Read More धक्कादायक : टीव्हीचे चॅनेल बदलला म्हणून बहे येथे शाळकरी मुलाची आत्महत्या
चक्रीवादळामुळे राज्यातील किनारपट्टी भागाचं प्रचंड नुकसान
निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यातील किनारपट्टी भागाचं प्रचंड नुकसान झालं आहे. याचा सर्वाधिक फटका रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन यांना बसला आहे. येथील किनारपट्टी भागातील अनेक घरांचं नुकसान झालं आहे. याशिवाय शेकडो आंबा बागांचं देखील नुकसान झालं आहे. तसंच अनेक विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडली आहेत. त्यामुळे येथील वीज पुरवठा गेल्या अनेक तासांपासून खंडीत आहे.
दरम्यान, या चक्रीवादळामुळे राज्यात दोन जणांचे बळी गेल्याचं समजतं आहे. या वादळामुळे राज्यातील अनेक भागांचं बरंच नुकसान झालं आहे. त्यामुळे आता प्रशासन काही भरपाई देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
4 जण जखमी झाले मात्र जीवितहानी नाही
निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी झाडे पडण्याचे तसेच विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडले. यात 4 जण जखमी झाले मात्र जीवितहानी नाही तसेच नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. नुकसानीबाबत 2 दिवसात भरपाई रक्कम शासकीय नियमांप्रमाणे दिली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. हे चक्रीवादळ जिल्ह्यातून पुढे सरकले असून पाऊस थांबताच नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरीत डिझेल वाहतूक करणारी एक बोट भगवती बंदरात होती. वा-याच्या वेगाने जहाजाचा अँकर तुटल्याने ती भरकटत पांढरा समुद्रापर्यंत आली. ही नाव किना-याला आणली असून यावरील 13 खलाशांना सुखरूपपणे वाचविण्यात यश आले आहे. हे खलाशी डिझेल पुरवठा करून परतण्यासाठी निघाले, परंतु वादळाच्या सुचनेमुळे थांबले होते. या प्रवाशांमध्ये 10 भारतीय असून 3 परदेशी आहेत. यामुळे या सर्वांना क्वारंटाईन करून त्यांचे स्वँब घेतले जातील, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असे सामंत म्हणाले. हे जहाज खडकावर आदळून त्याला छिद्र पडल्याने वापरून झालेले इंजिन ऑइल सांडले, परंतु धोका नाही. बोट महिनाभर येथेच राहील असे ते म्हणाले. मंडणगड आणि दापोली तालुक्यात मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती तेथील विभागीय अधिकाऱ्यांनी दिली आहे असे त्यांनी सांगितले.
सर्वाधिक फटका खेड तालुक्याला ; चार जखमी एकाचा मृत्यू
निसर्ग वादळाचा जिल्ह्यात सर्वाधिक फटका खेड तालुक्याला बसला आहे. या वादळात वहागाव ता खेड येथे तानाजी नवले व नारायण नवले यांच्या घराचे पत्रे उडून चार जण जखमी झाले. मंजाबाई अनंता नवले वय 65 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वांजळे ता खेड येथील विजेच्या खांबावरील तार तुटून पडल्याने एक म्हैस ठार झाली तर तिच्या मालकिनीला विजेचा झटका बसल्याने किरकोळ जखमी झाल्या आहेत. तालुक्यात सर्वाधिक घरांचे पत्रे छत उडून नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक इंदिरा आवास, शबरी घरकुल व रमाई घरकुल योजनेंतील घरे असून अंगणवाड्या, शाळा यांच्या इमारतीचे निसर्ग वादळाने मोठे नुकसान केले आहे.
खेड तालुक्यात आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास निसर्ग वादळ दाखल झाले त्याची तीव्रता हळूहळू वाढत गेली. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये विजेचे खांब पडले. अनेक गावांमध्ये असलेली छोटी मोठी झाडे जमीनदोस्त झाली. वादळात झाडे पडल्याने अनेक रस्ते काही काळ बंद झाले होते. स्थानिकाच्या मदतीने रस्त्यातील झाडे, विजेच्या तारा बाजूला करून रस्ते मोकळे करण्यात आले. खेड तालुक्यातील वहागाव येथे घराचे पत्रे उडून व भिंत पडल्याने चार जण जखमी झाले. यात एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. उर्वरित जखमींवर चाकण येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.