25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात पावसाचा धुमाकूळ, अनेक भागांत रेड अलर्ट

राज्यात पावसाचा धुमाकूळ, अनेक भागांत रेड अलर्ट

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणा-या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, पालघर, पुणे शहर, गडचिरोली या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये ‘एनडीआरएफ’च्या १३ आणि ‘एसडीआरएफ’ची दोन पथके तैनात आहेत. तसेच गेल्या १२ दिवसांत अतिवृष्टीमुळे राज्यात ८४ नागरिकांचा तर १८० जनावरांचा मृत्यू झाला आहे.

मध्ये रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
मध्य रेल्वेची वाहतूक पंधरा ते वीस मिनिटं उशिराने सुरु आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या मध्य उपनगरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबई लोकलचा वेग मंदावला आहे.

चंद्रपूर येथील रहमतनगर भागात इरई नदीचे पाणी शिरायला सुरुवात
चंद्रपूर शहरातल्या रहमत नगर भागात इरई नदीचे पाणी शिरायला सुरुवात झालीय. जवळपास ६० ते ७० घरात नदीचे पाणी शिरले असून लोकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घेतलाय. इरई धरणाचे सर्व म्हणजे ७ दारे १ मीटरने उघडल्याने इरई नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. नदीचे पाणी सातत्याने वाढत राहिल्यास चंद्रपूर शहरातल्या आणखी काही भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे.

पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात
पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून सर्व तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसायला लागला आहे. तर अनेक ठिकाणचे रस्ते बंद होण्याची शक्यता निर्माण झालीय.

वसईमध्ये घरावर दरड कोसळली
वसईमध्ये घरावर दरड कोसळली असून या मध्ये एकाच कुटुंबातील चौघेजण फसले. त्यातील दोघा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून दोन जण आत फसले असल्याची माहिती मिळालीय.

पुणे शहरासाठी पुढील दोन दिवस रेड अलर्ट
मागील तीन ते चार दिवसांपासून पुणे शहर आणि धरण क्षेत्राच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे खडकवासला धरणात क्षमतेच्या १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. आणखी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन मध्यरात्रीपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सुरुवातीला सुमारे १००० क्युसेक पाणी सोडण्यात येत होते.

पालघरमध्ये दोन दिवस अतिवृष्टी, रेड अलर्ट जारी
भारतीय हवामान विभाग आणि प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार दिनांक १२ आणि १४ जुलै दरम्यान पालघर जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार (अतिवृष्टी ) पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईला ‘ऑरेंज अलर्ट’
मुंबईसह उपनगरांत पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दक्षिण मुंबईत मुसधळार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच, अनेक सखल भागांत पाणी साचण्यासही सुरुवात झाली आहे. पाणी साचत असलेल्या भागात वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. माहीम, दादर, परळ, भायखळा भागांत जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईला पुढील दोन दिवस हवामान विभागाकडून पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

आज दुपारी १ वाजेपर्यंत मुंबई, कल्याण, ठाणे आणि नवी मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागने म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या