मुंबई : काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते रामदास कदम एका पत्रकार परिषदेत बोलताना भावनिक झाले होते. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राने त्यांच्या डोळ्यांत अश्रू पाहिले होते. दरम्यान, आज एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी इथून पुढे डोळ्यांतून कधीच पाणी काढणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मुलाखतीचा शेवट त्यांनी या वाक्याने केला आहे.
रामदास कदम म्हणाले की, मी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटलो. त्यांच्याशी दोन महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केली आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्णय झाला आता मराठा समाजाला आरक्षणात न्याय देणार का?, असा सवाल केला असता मुख्यमंत्री शिंदेंनी समाधानकारक उत्तर दिले आहे.
यानंतर गोवा-मुंबई महामार्गाचे काम पूर्ण करण्याविषयी विचारले असता, शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून ताबडतोब महामार्गाचे काम पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी दिले आहे. तुम्ही कोणत्या पक्षात जाणार आहात का? अशी विचारणाही मी मुख्यमंत्री शिंदे यांना केली असल्याचे कदमांनी सांगितले आहे.
‘मातोश्री’वर पुन्हा जाणार का असा सवाल केला असता कदम म्हणाले, हकालपट्टी हा शब्द माझ्या जिवाला लागला आहे. अडीच तीन-वर्षांत मी ‘मातोश्री’वर गेलो नाही आणि आता तिकडे परत जाणे मला कठीण वाटत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मी हट्टी नाही पण स्वाभिमानी आहे. स्वाभिमान गहाण ठेवून काही नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि संघर्षाची शिकवण दिली आहे. त्यामुळे गुडघे टेकणारा रामदास कदम नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
या मुलाखतीच्या शेवटी ते म्हणाले की, यापुढे मी डोळ्यांतून पाणी काढणार नाही. मात्र समोरच्याला डोळ्यांतून पाणी नक्की काढायला लागणार, असा इशाराच त्यांनी दिला आहे.