कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १९ फेब्रुवारीला दोन दिवसांच्या कोल्हापूर दौ-यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे तीन आठवड्यांमध्ये तिस-या केंद्रीय मंर्त्यांचा कोल्हापूर दौरा होत आहे. यापूर्वी जानेवारीचा पहिला पंधरवडा उलटल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे आणि नितीन गडकरी कोल्हापूर दौ-यावर होते.
दरम्यान, अमित शाह यांच्या कोल्हापूर दौ-यासाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला अमित शाह उपस्थित राहतील. तसेच करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर भेट, शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत.
दुपारी त्यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयासाठी घेतलेल्या नागाळा पार्कमधील नव्या जागेत मंदिर बांधकामाचा प्रारंभ होणार आहे. त्याठिकाणीच भाजप कार्यकर्त्यांचा मेळावाही होणार आहे. सायंकाळी लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून आयोजित लोकप्रवास योजनेंतर्गत होणा-या मेळाव्याला ते उपस्थित राहाणार आहेत. दरम्यान, शाह यांचे कार्यक्रम होणा-या ठिकाणांची पाहणी मंत्री चंद्रकांत पाटील करणार आहेत.
तीन आठवड्यांमध्ये तीन केंद्रीय मंत्री कोल्हापुरात
दरम्यान, जानेवारी महिन्यात केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचाही कोल्हापूर दौरा झाला. ज्योतिरादित्य शिंदे यांचा तीन महिन्यात दुस-यांदा दौरा होता. दुसरीकडे कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वाराच्या सौंदर्यात भर घालणा-या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा कोल्हापूर बास्केट ब्रिजची पायाभरणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.