गुंडांना हद्दपार करा

  पोलिस अधीक्षक मगर यांचे आदेश

  328

  नांदेड : विशेष प्रतिनिधी
  गेल्या दोन महिन्यापासून कोव्हीड-१९ मुळे पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. सर्वप्रथम नागरिकांचे जीव वाचविणे महत्वाचे होते. प्रशासकीय आदेशामुळे जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊ न असल्यामुळे सर्व बंदोबस्त त्यासाठी लावण्यात आला होता. याच दिवसात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. परंतु लॉकडाऊ न संपत असतांनाच गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात खूनाचे प्रकार वाढल्याचे निदर्शनास आल्यामुळे काही सराईत गुंडांना जिल्हा बंदी करुन तडीपार करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पोलिस उपअधीक्षकांना आदेश देण्यात आले असून सराईत गुंडांना तात्काळ हद्दपार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती पोलिस अधीक्षक विजय मगर यांनी एकमतशी बोलतांना दिली.

  गेल्या ६५ दिवसापासून जिल्ह्यामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडला नव्हता. संपूर्ण जिल्हा लॉकडाऊ न होता. यावेळी नागरिकांनी अनेक ठिकाणी स्वयंस्फुर्तीने प्रतिसाद दिला होता. सुरुवातीच्या काही दिवसात तर नांदेड जिल्हा ग्रीनझोन मध्ये होता. परंतु काही बाहेरुन आलेल्या प्रवाशांमुळे नांदेड जिल्ह्याला कोव्हीड-१९ ची लागण झाली. त्यानंतर दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत गेली. त्यामुळे पोलिस बंदोबस्त रस्त्यावर लावणे आवश्यक झाले. अनेक ठिकाणी टवाळक्या करत फिरणाºया वात्रट तरुणांवर कारवाई करण्याची वेळ आली.

  Read More  पेट्रोल पुन्हा भडकण्याची चिन्हे!

  पोलिस आपला जीव धोक्यात टाकून दिवस रात्र काम करीत आहेत. आपल्या जीवाची परवा न करता शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांना वारंवार सूचना देत होते की, घरात रहा.. सुरक्षीत रहा.. असे सांगत असतांनाही काही मात्र रस्त्यावर फिरत होते. अशावेळी पोलिस बांधव समोर येवून सूचना करत असतांना त्यांच्यावर धावून येण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले. तरी पोलिस डगमगला नाही. शहरामध्ये कन्टेमेंड झोनमध्ये कोव्हीड मोटारसायकलने पेट्रोलिंग करत होता. नांदेड जिल्ह्यात एकूण २0 ठिकाणी कन्टेनमेंट झोन निर्माण करण्यात आले होते. त्यासाठी पोलिस अधिकारी, कर्मचारी काम करत होते. पोलिस मुख्यालयात विलगीकरण कक्ष निर्माण करण्यात आला होता.

  पोलिसांसाठी जीवन रक्षा बिंदू निर्माण करण्यात आले. अशी विविध कामे करत असतांना गेल्या काही दिवसापासून सराईत गुंडांनी आपले तोंड वर काढले आहे. त्यामुळे वेळीच याचा बंदोबस्त होणे आवश्यक आहे. यावर अंकुश ठेवण्याची हीच वेळ आहे. आजपर्यंत झालेल्या खून प्रकरणातील आरोपी अवघ्या काही तासात ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांना पोलिस कोठडी मिळाली असून त्यांची चौकशी चालु आहे. भविष्यात जिल्ह्यामध्ये खूनासारखे प्रकार घडु नयेत यासाठी पोलिस सतर्क आहे असेही ते म्हणाले.

  संपूर्ण महाराष्टत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी आजघडीला नांदेड शहरामध्ये केवळ १३८ पॉझिटीव्ह रुग्ण आहेत तर ८ जणांचा यात मृत्यू झाला असला तरी अनेक जणांना इतर आजार देखील होते. त्यामुळे मृत्यूंच्या संख्येत वाढ दिसत आहे. भविष्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यांना पोलिस विभागाकडून सहकार्य करण्याचा आमचा परिपूर्ण प्रयत्न चालु असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

  २१ पोलिस कर्मचा-यांचा स्वॅब घेण्यात आला असून ६ निगेटिव्ह १५ प्रलंबित
  जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाने तोंड वर काढल्यामुळे स्वबची तपासणी करणे बंधनकारक झाले आहे. कोव्हीड- १९ नियंत्रीत आणण्यासाठी काही पोलिस कर्मचारी दिवस रात्र प्रयत्न करीत आहेत. त्यामध्ये २१ पोलिस कर्मचाºयांचा स्वॅब घेण्यात आला असून त्यापैकी ६ निगेटीव्ह आहेत तर १५ अद्यापही प्रलंबित आहेत. कोरोना विषाणू संदर्भात जिल्ह्यात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यामध्ये विशेषता क्वॉरंटाईल २0 झोन मध्ये कर्मचारी काम करीत होते.

  त्यामध्ये ६ अधिकारी, १२४ कर्मचारी तर ७२ होमगार्ड कार्यरत आहेत. कन्टेनमेंट झोनमध्ये कोव्हीड मोटारसायकल पेट्रोलिंगसाठी तयार करण्यात आली असून ३२ मोटारसायकलवर ६२ कर्मचारी पेट्रोलिंग करत आहेत. एकूण बंदोबस्तासाठी २६२ कर्मचारी आहेत. क्वारंटाईल करण्यात आलेल्या पोलिस अधिकारी २ तर कर्मचारी २८ असे एकूण ३0 कर्मचारी आहेत. पोलिस मुख्यालय येथे विलगीकरण कक्ष निर्माण करण्यात आले असून नंदीग्राम १ मध्ये १५ पुरुष, नंदीग्राम २ मध्ये १५ पुरुष तर रत्नेश्वरीमध्ये १0 महिला असा एकूण ४0 जणांसाठी कक्ष निर्माण करण्यात आला आहे.