27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात येणारा उद्योग गुजरातमध्ये कसा?

महाराष्ट्रात येणारा उद्योग गुजरातमध्ये कसा?

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यात येत असल्याचा आरोप भाजपवर होत असताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलेल्या एका दाव्याने ही चर्चा पुन्हा सुरू होणार असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंतिम झालेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. वेदांता-फॉक्सकॉनने गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेमुळे आपल्याला धक्का बसला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी वेदांता समूहाच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले असल्याचे म्हटले. आदित्य ठाकरे यांनी वेदांता समूहाचे अनिल अग्रवाल यांच्या ट्विटचे स्क्रीनशॉट शेअर करत ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, भारतात सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प सुरू होतोय याचा आनंद आहे. मात्र, महाराष्ट्रातून हा प्रकल्प बाहेर गेल्याने धक्का बसला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह मी बैठका घेतल्या होत्या.

महाराष्ट्रात हा प्रकल्प सुरू करण्याबाबत सर्वकाही अंतिम करण्यात आले होते. हा प्रकल्प राज्यात आला असता तर नवीन सरकारला याचे श्रेय घेता आले नसते. या नव्या सरकारकडे आपल्या राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेण्याची वचनबद्धता दिसत नसल्याची टीका आदित्य यांनी केली.

सेमीकंडक्टरबाबत आत्मनिर्भर होण्यासाठी भारतातील उद्योजकांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील काही वर्षांपासून सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे भारतातील उद्योगांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. ऑटो आणि स्मार्टफोन निर्मिती उद्योगांना मोठा फटका बसला होता. सोमवारी वेदांता समूहाने फॉक्सकॉन कंपनीसोबत २० अब्ज डॉलरचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करणार असल्याची घोषणा केली. अहमदाबादजवळ हा सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यात येणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या