26.6 C
Latur
Monday, March 20, 2023
Homeआंतरराष्ट्रीयतुर्कस्तान, सीरियात मोठी हानी, ८४ देशांची बचावपथके दाखल

तुर्कस्तान, सीरियात मोठी हानी, ८४ देशांची बचावपथके दाखल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
विनाशकारी भूकंपाच्या धक्क्यांनी उद्ध्वस्त झालेल्या तुर्कस्तानात इमारती जमीनदोस्त झाल्याने सर्वत्र मृत्यूचे तांडव पाहायला मिळत आहे. मृतांचा आकडा आता ५ हजारांवर गेला आहे. मात्र, इमारतींच्या मलब्याखाली आणखी हजारो नागरिक दबले गेले आहेत. त्यामुळे मदत व बचावकार्य वेगात सुरू आहे. या कार्याला वेग यावा यासाठी जगभरातून ८४ देशांनी बचावपथके पाठवली आहेत. तेथे युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेण्यात आले आहे. तुर्कस्तान लष्कराच्या मदतीने विविध देशांमधील बचावपथके वेगाने मदत कार्यात गुंतले आहेत. यात भारताच्या एनडीआरएफसह वैद्यकीय पथकही तुर्कस्तानात दाखल झाले आहे.

जागतिक आरोग्य संघटना आणि अन्य आंतरराष्ट्रीय संघटना आणि देशांनीही तुर्कीला मदत देऊ केली आहे. पोलंडने अग्निशामन दलाच्या ७६ जवानांसह आठ प्रशिक्षित श्वानांना पाठविले आहे. युरोपीय आयोगाने जमिनीवरील पथकांना मदत व्हावी म्हणून उपग्रह मॅपिंग सेवा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनचे अध्यक्ष व्होल्दोमीर झेलेन्स्की यांनी आम्हीदेखील मदत करू असे म्हटले आहे. स्पेन, तैवान आणि इस्राईलनेदेखील मदतसामग्री पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रशियाची बचाव पथके रवाना होणार आहेत.

शोध आणि बचाव मोहिमेला वेग यावा म्हणून तुर्कीच्या सुरक्षा दलांनी वेगळा एअर कॉरिडॉर तयार केला आहे. विविध देशांकडून येणारी मदत थेट दक्षिणेकडील भूकंपग्रस्त भागांमध्ये पोचू शकेल, यासाठी नियोजन केले आहे. दरम्यान, इराक आणि तुर्कीदरम्यानची तेलवाहिनी सुरक्षित असून त्यातून सुरू असलेला पुरवठा कायम असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मृतांचा आकडा ५ हजारांवर
तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी प्रलयंकारी भूकंप झाला. या भूकंपाच्या धक्क्याने जीवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली असून, मृतांचा आकडा आता ५ हजारांवर पोहोचला आहे. एकापाठोपाठ एक सतत बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे येथील हजारो घरेआणि इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. ढिगा-याखालून अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी शोध आणि बचाव पथके शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

लिरामध्ये घसरण
भुकंपाच्या धक्क्यातून सावरत असलेल्या तुर्कीयेचे चलन लिरामध्ये मोठी घसरण होत आहे. डॉलरच्या तुलनेमध्ये लिराने नीचांकी गाठली. या भूकंपामुळे महागाईचा भस्मासूर आणखी भडकू शकतो अशी भीती व्यक्त होत आहे. त्यात तुर्कस्तानवर अमेरिकेने निर्बंध घातले असल्याने परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या