अक्कलकुवा : आक्षेपार्ह व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवण्याच्या वादातून अक्कलकुवा येथे काल मध्यरात्री तुफान दगडफेक करण्यात आली असून, दुचाकीसह, चार चाकी गाड्यांचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच मध्यरात्रीच पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. आतापर्यंत १५ संशयित आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिली आहे.
आक्षेपार्ह स्टेटसचा वाद
राज्यातील इतर भागांमध्ये सुरू असलेल्या वादाचे पडसाद नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरात पाहायला मिळाले आहेत. आक्षेपार्ह व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवण्याच्या वादातून काल मध्यरात्री १२ वाजेनंतर तुफान दगडफेक झाली आहे. पोलिसांनी समज दिल्यानंतरही पोलिस स्टेशनमधून परतत असताना काही जणांनी केलेल्या दगडफेकीनंतर वातावरण चिघळले होते. अक्कलकुवा शहरातील झेंडा चौक, बाजार पेठ, तळोदा नाका, मरीमाता मंदिर परिसरात दुचाकी व चारचाकी गाड्यांचे दगडफेकीत नुकसान झाले आहे.
अफवांना बळी पडू नका
अक्कलकुवा शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून नंदुरबार पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्यासह पोलिस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी अक्कलकुव्यात दाखल झाले आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर तसेच धार्मिक तेढ निर्माण होईल अशा अफवांना बळी पडू नये असे आवाहन पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे.