कोल्हापूर : कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने आपल्या दोन मुलांसह पत्नीला कालव्यात ढकलून स्वत: गळफास घेत आत्महत्या केली आहे. यातील कालव्यात ढकललेल्या एका मुलीला वाचवण्यात यश आले आहे. संदीप पाटील (वय ३६ वर्षे) असे आपल्या पत्नी आणि मुलाची हत्या करून स्वत: गळफास घेणा-या व्यक्तीचे नाव आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील हसवडे ग्रामपंचायतच्या मागे राहणारे संदीप अण्णासो पाटील यांचा पत्नी, मुलगा व एक मुलगी असा परिवार.
काल दुपारच्या सुमारास त्यांनी कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत असलेल्या डाव्या कालव्याजवळ आपली पत्नी राजश्री संदीप पाटील (वय वर्षे ३२), मुलगा सुमित (वय वर्षे आठ) आणि मुलगी श्रेया पाटील (वय वर्षे १४) यांना बोलावले.
ते कालव्याजवळ आले असता संदीपने दोन्ही मुलांना व पत्नीला पाण्यात ढकलून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोल्हापुरातील कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत घडली आहे.