हैदराबाद : हॅरी ब्रूक याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने कोलकाताविरोधात निर्धारित २० षटकात ४ विकेटच्या मोबदल्यात २२८ धावांचा डोंगर उभारला. यंदाच्या हंगामातील ही सर्वाधिक धावसंख्या ठरली आहे. हॅरी ब्रूक याने विस्फोटक फलंदाजी करत ५५ चेंडूत शतक झळकावले. हॅरी ब्रूक याने यंदाच्या हंगामातील पहिलेवहिले शतक झळकावले.
कोलकाता विरोधात हॅरी ब्रूकने सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी केली. त्याने चारी बाजूने धावांचा पाऊस पाडला. त्यामुळे अवघ्या ५५ चेंडूत त्याने शतक झळकावले.हैदराबादने इंग्लंडच्या हॅरी ब्रूकसाठी कोट्यवधी रुपये मोजले होते. आयपीएलच्या सोळाव्या हंगामापूर्वी झालेल्या लिलावात हैदराबादने हॅरी ब्रूक याला १३.२५ कोटी रुपये खर्च करून आपल्या ताफ्यात घेतले होते. पण सुरुवातीच्या सामन्यात हॅरी ब्रूक याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. पण आज अखेर हॅरी ब्रूक याने वादळी खेळी करत सर्वांनाच प्रभावित केले.