मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे सर्व विरोधी पक्षांना एका मंचावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नितीश कुमार या संदर्भात सर्व विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भेटी घेत आहेत. जर सर्व विरोधी दलांचा समन्वय घडून आला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार असतील अश्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. या सर्व चर्चाना शरद पवार यांनी पूर्णविराम दिला असून मी फक्त विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे. मी पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत नाही कारण मी पुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही. असा खुलासा त्यांनी केला आहे.
देशाच्या भल्यासाठी काम करणारे नेतृत्व विरोधकांना मिळावे अशी माझी इच्छा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे देखील विरोधकांना बळ देण्याचा प्रयत्न करत आहेत. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू राम ताकवले यांच्या निधनानिमित्त आयोजित शोकसभेत सहभागी होण्यासाठी ते आले होते. येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
राहुल गांधींचे कौतुक
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाबद्दल शरद पवार यांनी राहुल गांधींचे कौतुक केले. कर्नाटक निवडणूक निकाल हे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या यशाचे उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले. लोक त्यांच्याबद्दल काहीही म्हणतील, पण मला खात्री आहे की, लोक राहुल गांधींच्या विचारसरणीला बळ देतील.
सरकार एजन्सीचा गैरवापर करत आहे
सरकार एजन्सीचा गैरवापर करत आहे. सरकार केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षांच्या नेत्यांना अडचणीत आणत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्रास देऊन भाजपला काही मिळवायचे असेल, पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत ते साध्य होऊ देणार नाही. असे ते म्हणाले.
जागावाटपाचा निर्णय लवकरच
जागावाटपावरून महाविकाघडीत चांगलेच वातावरण तापले आहे . यावर शरद पवार माध्यमांना सांगितले आहे की, नुकतीच माझ्या निवासस्थानी बैठक झाली. याबाबत एमव्हीएचे नेते निर्णय घेतील. उद्धव ठाकरे, सोनिया गांधी किंवा काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खरगे आणि मी भेटून या विषयावर चर्चा करू. यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे शरद पवार म्हणाले.