नाशिक : पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीत सध्या जोरदार रंगू लागली आहे. काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावरून राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिकमध्ये काहीतरी वेगळे शिजत आहे याची बातमी आपल्याला आधीच मिळाली होती. त्याबाबत आधीच आपण बाळासाहेब थोरात यांना अलर्ट केले होतं. पण बाळासाहेब थोरात यांनी आपल्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. ‘वेगळा पर्याय होईल हे कानावर आलं होतं. त्याचवेळी मी थोरातांना अलर्ट केले होते’, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठी राजकीय खेळी खेळल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला नाही. त्यांनी आपला मुलगा सत्यजित तांबे यांना पांिठबा दिला आहे. तर भाजपनेही या निवडणुकीसाठी उमेदवार उभा केलेला नाही. यामुळे दुसरीकडे काँग्रेसकडून तांबे पिता-पुत्रांवर कारवाई केली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.
दोन-तीन दिवसांआधी कानावर येत होतं. त्यावेळी मी स्वत: बाळासाहेब थोरात यांच्याशी बोललो की, असं काहीतरी कानावर ऐकू येतंय. तुम्ही काळजी घ्या. तुम्ही बघा, काही वेगळं शिजतंय अशी बातमी आहे. हे मी बाळासाहेब थोरातांना आधल्या दिवशी सांगितलेलं होतं. ते म्हटले की, तुम्ही काळजी करु नका. आमच्या पक्षाची जबाबदारी आहे. आम्ही व्यवस्थित पार पाडू. उद्या डॉक्टर सुधीर तांबे यांचाच फॉर्म भरला जाईल असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.