मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास व एफएसआयमधील कथित घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर कोर्टाने चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. ही कोठडी आज संपत असल्याने राऊत यांना पुन्हा ईडी अधिका-यांकडून कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी राऊत यांनी कोठडीतील गैरसोयीबद्दल तक्रार केली आहे.
मला ज्या ठिकाणी ठेवले त्या ठिकाणी व्हेंटिलेशन नाही. तिथे मोठ्या प्रमाणात गैरसोय आहे. मला हृदयविकाराचा त्रास आहे. त्यामुळे श्वास घेण्यासही त्रास होतो. रात्री जिथे मला झोपायला देतात तिथेही तीच परिस्थिती आहे. हवा येण्याजोगी एकही खिडकी नाही, अशी तक्रार संजय राऊत यांनी केली.
राऊत यांच्या या तक्रारीनंतर कोर्टाने याबाबत ईडीच्या अधिका-यांना विचारणा केली. त्यावर राऊत यांना ठेवण्यात आलेल्या खोलीत एसी असल्याचे अधिका-यांनी सांगितले. तसेच मोकळी हवा असणा-या खोलीत ठेवण्याची तयारीही दर्शवली आहे.
काय आहे ईडीचा दावा?
‘पत्राचाळ पुनर्विकास व एफएसआय घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे फ्रंट मॅन म्हणून कार्यरत होते. संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्यानेच प्रवीण यांनी म्हाडाकडून आवश्यक त्या मंजुरी मिळवल्या. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात प्रवीण यांनी अवैधरीत्या मिळवलेल्या ११२ कोटी रुपयांपैकी १ कोटी ६ लाख रुपये हे संजय राऊत व त्यांच्या कुटुंबीयांकडे थेट गेले असल्याचे आत्तापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले असून ही रक्कम आणखीही असू शकते’, असा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) याआधी कोर्टात केला होता.