22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रमी यांच्यावर अंधविश्वास ठेवला ; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

मी यांच्यावर अंधविश्वास ठेवला ; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

एकमत ऑनलाईन

मुंबई : परिवारातले समजून मी यांच्यावर अंधविश्वास ठेवला हीच माझी चूक झाली. समजा मी त्यांना मुख्यमंत्री केले असते तर यांनी काय वेगळे केले असते? त्यांची भूकच भागत नाही, आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय. स्वत:ची तुलना शिवसेनाप्रमुखांशी करत आहेत, ती राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. याला हावरटपणा म्हणतात, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या अभूतपूर्व बंडाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि सरकार कोसळले. यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. या सर्व घडमोडींनंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच ‘सामना’चे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना मुलाखत दिली. या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसारित झाला. यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासह भाजपवर जोरदार शाब्दिक वार केले.

सेनाप्रमुख व्हायचंय
‘मलई खाण्यासाठी मी मुख्यमंत्रिपदी नव्हतो. स्वत:कडे कोणतीही मोठी खाती ठेवली नव्हती. एका मंत्र्याने दिवा लावला म्हणून ते खातं माझ्याकडे आलं होतं,’ असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार संजय राठोड यांना टोला लगावला. नक्की काय चुकलं, संजय राऊत यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, चूक माझी आहे. गुन्हा माझा आहे. तो म्हणजे मी यांना परिवारातले समजून त्यांच्यावर अंधविश्वास ठेवला. समजा मी यांना मुख्यमंत्री केलं असतं तर यांनी काय वेगळं केलं असतं? त्यांची भूकच भागत नाही, आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय. स्वत:ची तुलना शिवसेना प्रमुखांशी करत आहेत, असा आरोप करत सध्या सुरू आहे ती राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. याला हावरटपणा म्हणतात.

…तेव्हा सत्तांतराच्या हालचाली सुरू होत्या : उद्धव ठाकरे
मुख्यमंत्रिपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे कधीही बाहेर पडले नाहीत, असा आरोप त्यांच्यावर वारंवार झाला. या काळात उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव उद्धव ठाकरे राज्यभर फिरले नाहीत, असेही सांगण्यात आले. मुलाखतीत शस्त्रक्रियेविषयी बोलताना उद्धव ठाकरे भावूक झाले. ‘शस्त्रक्रियेनंतर एकदा मानेखालील शरीराची हालचाल बंद पडली होती,’ असे त्यांनी सांगितले. काहीजण मी बरा होऊ नये म्हणून देव पाण्यात
बुडवून बसले होते.

आता तेच लोक पक्ष बुडवायला निघाले आहेत. मी उभा राहू शकत नव्हतो, याचा काहींना आनंद झाला होता. माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती तेव्हा सत्तांतरासाठी हालचाली सुरू होत्या, असा मोठा आणि गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला. शिवसेनेकडे आम्ही पक्ष नव्हे परिवार म्हणून पाहिले. ज्यांना पक्ष सांभाळायला दिला त्यांनीच विश्वासघात केला, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

पुन्हा एकदा सामान्यातून असामान्य घडवू
सामान्यातून आता असामान्य घडवण्याची वेळ आली. चला उठा पुन्हा एकदा सामान्यातून असामान्य घडवू. त्यांना मी ताकद दिली ही माझी चूक झाली. राजकारणात जन्म दिला त्यांना गिळायला निघालेली ही औलाद आहे. विश्वासघातकी.. आईलाच गिळायला निघाले आहेत. निष्ठा कधीच विकली जाऊ शकत नाही. ज्यांनी जन्म दिला त्यांनाच संपवायला निघाले आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या