सांगली/नांदेड : महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४८ गावातील नागरिकांनी पाण्याच्या प्रश्नावरुन कर्नाटकमध्ये जातो असा इशारा दिला होता. तेव्हापासून इतर सीमाभागातील गावांकडूनही महाराष्ट्र सोडण्याचा इशारा दिला जात आहे. हे प्रकरण केवळ सांगली-सोलापूर इथपर्यंतचे मर्यादीत राहिले नाही तर नांदेड, नाशिक आणि विदर्भापर्यंत पोहचले आहे. विकासाच्या मुद्यांवर गावातील नागरिकांनी महाराष्ट्र सोडण्याचा इशारा दिला आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचा जयघोष आपल्या महाराष्ट्रात होत आहे. महाराष्ट्रसोडून कर्नाटकात जायची भाषा आपल्या महाराष्ट्रात बोलली जात आहे. लोक रस्त्यावरून उतरून तेलंगणात जाऊ द्या असे सांगत आहेत. त्याशिवाय नाशिकमधील काही गावातील लोकांनी गुजरातमध्ये जाऊ द्या अशी मागणी केली आहे.
जतच्या ४८ गावांना कर्नाटकात जायचे आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली, धर्माबाद, उमरी, देगलूर, किनवट तालुक्यातील काही गावांना तेलंगणात जायचे आहे. सोलापूर अक्कलकोटच्या या गावक-यांना कर्नाटकात जायचेय. नाशिकमधील सुरगाणा तालुक्यातील ग्रामस्थांची गुजरातमध्ये विलीन होण्याची मागणी केली आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातल्या तेलंगणा राज्याशी सीमावाद असलेल्या १४ गावांचा प्रश्न सोडवा, अशी मागणी सीमा भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.
देश स्वातंत्र्य होऊन ७५ वर्षे झाले आहेत. महाराष्ट्राची निर्मिती होऊन साठ वर्षे लोटली. सीमावर्ती भागातील लोकांच्या मूलभूत गरजा अजूनही तशाच आहेत. एकीकडे शहरी भागात महामार्गाचे जाळे विस्तारत आहे. गाव खेड्यांना जोडणारे रस्ते शोधूनही सापडत नाहीत. सांगली, नांदेड आणि सोलापूर जिल्ह्याचे काही भाग बहुभाषिक. मराठी सारखीच येथे कन्नड, तेलगु प्रवाही बोलली जाते. आम्ही बहुभाषिक आहोत, सीमेवर राहतो म्हणून विकासापासून दूर ठेवतात का ? असा सवाल येथील नागरिकांचा आहे.