सातारा : पक्षाने आदेश दिला तर मी माढा मतदारसंघातून लोकसभा लढण्यास तयार आहे. त्याबाबत खासदार शरद पवार यांचा निर्णय अंतिम असेल; पण माढ्याचा खासदार फलटणच्या वाड्यातील होईल. वाड्याबाहेरचा होणार नाही, असे स्पष्ट मत विधान परिषदेचे माजी सभापती, आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.
सातारा जिल्हा बँकेच्या नफ्यातून शेतक-यांसाठी विविध तरतुदी करण्यासाठी आज बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर माजी सभापती, आमदार रामराजे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.
रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त फलटण येथे नुकत्याच झालेल्या अभीष्टचिंतन सोहळ्यात विरोधी पक्षनेते अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रामराजेंना दिल्लीत पाठवण्याची गरज आहे, त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढे हा विषय मांडून मान्य करून घेतला जाईल, असे जाहीर केले होते.
त्यामुळे राष्ट्रवादीकडून माढा लोकसभेसाठी रामराजेंचे नाव निश्चित असल्याचे स्पष्ट झाले; पण रामराजेंची भूमिका महत्त्वाची होती. ते या निर्णयाला मान्यता देणार का?, तसेच शरद पवारांचा दुजोरा मिळणार का?, हा प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित होऊ लागला होता.
यासंदर्भात रामराजेंना विचारले असता ते म्हणाले, पक्षाने आदेश दिला तर मी माढा लोकसभेची निवडणूक लढण्यास तयार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवारांचा निर्णय अंतिम असेल; पण माढ्याचा खासदार यावेळेस फलटणच्या वाड्यातीलच होईल. वाड्याबाहेरचा खासदार होणार नाही, असे खोचक उत्तर देत भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना अप्रत्यक्ष आव्हानच दिले.