‘वाधवानचा बागबान कोण? या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी
अहमदनगर : ‘कोरोनाच्या संकंटात राज्यातील जनतेला दिलासा देण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडायला तयार नाहीत. मुख्यमंत्री फेसबुकवरच संवाद साधतात. त्यामुळे सरकारचा कारभार यापुढे आता फक्त फेसबुकवर चालणार का?’, असा खोचक सवाल भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
‘केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची राज्यात अंमलबजावणी केली जात नाही. केंद्राने दिलेल्या निधीचा योग्य उपयोग राज्य सरकार करत नाही’, असा गंभीर आरोप विखे पाटलांनी केला. भाजपतर्फे आज (19 मे) राज्यभरात ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन करण्यात आलं. त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून विखे पाटलांनी तहसीलदारांना निवेदन दिलं. त्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.
Read More मजुरांना नेणा-या ट्रॅव्हल्सला अपघात; एकाचा मृत्यू, ९ गंभीर
‘शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. दुधाला सरसकट पाच रुपये अनुदान द्यावे आणि शेतकऱ्यांसाठी त्वरित आर्थिक पॅकेज जाहीर करावं’, अशी मागणी विखे पाटलांनी केली.
‘शेतकरी आणि जनतेची चिंता न करता नगर जिल्ह्यातील तीनही मंत्री मुंबईत जावून बसलेत’, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात , जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख आणि राज्यमंत्री प्रसाद तनपुरे यांना लगावला.
‘परप्रांतीय कामगारांसाठी उपाययोजना नाहीत. मजुरांची जीवघेणी पायपीट सुरु आहे. मात्र त्यांची कोणतीही काळजी सरकारला नाही. राज्याच्या विकासात परप्रांतियांचादेखील वाटा आहे. मात्र राज्य सरकारकडून त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही’, अशी टीका विखे पाटलांनी केली. ‘वाधवानचा बागबान कोण? या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. मात्र अमिताभ गुप्तांना क्लिनचिट दिली गेली’, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.