बंगळुरू : कर्नाटकातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेले आहे. सत्ता मिळविण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये चुरशीची राजकीय लढाई दिसत आहे. कर्नाटकाच्या विधानसभा निवडणुकीत ‘बजरंगबली’ हे सध्या केंद्रस्थानी आले आहेत. पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर राज्यात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास राज्यात ठिकठिकाणी हनुमान मंदिरांचे बांधकाम आणि जीर्णोद्धार करण्याचे जनतेला आश्वासन दिले आहे.
कर्नाटक काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार यांनी गुरुवारी म्हैसूरमधील चामुंडी टेकडीवर देवी चामुंडेश्वरी व बजरंगबली यांची पूजा केली. यानंतर त्यांनी माध्यमांना सांगितले की, राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे बांधली जातील. एवढेच नाही तर त्या मंदिरांचे काम कसे सुरू आहे हे पाहण्यासाठी एक विशेष मंडळही स्थापन करण्यात येईल. यासोबतच हनुमानाची तत्त्वे तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष कार्यक्रमही आयोजित केली जातील.
भाजप जनतेच्या भावनांशी खेळत आहे
कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांनीही भाजपवर हल्ला चढवला. ते म्हणाले की, हनुमान मंदिरांबाबत भाजपची भूमिका स्पष्ट नाही. भाजपने आतापर्यंत किती हनुमानाची मंदिरे बांधली ते जाहीर करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे नेते राजकीय फायद्यासाठी देवाच्या नावाचा वापर करून ते जनतेच्या भावनांशी ते खेळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पंतप्रधान मोदी विरोधात काँग्रेसची तक्रार
काँग्रेस लीगल सेलचे एसए अहमद यांनी माध्यमांना सांगितले की, लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे केएस ईश्वरप्पा यांच्या विरुद्ध काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी हिंदू देवी-देवतांचा वापर करून मते मागत आहेत आणि त्यांच्या रोड शोमुळे लोकांची मोठ्या प्रमाणात लोकांची गैरसोय होत आहे. याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.