24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रहिंमत असेल तर महिन्यात निवडणुका घेऊन दाखवा

हिंमत असेल तर महिन्यात निवडणुका घेऊन दाखवा

एकमत ऑनलाईन

मुंबईत घिरट्या घालणा-या गिधाडांना आस्मान दाखविणार

मुंबई : आतापर्यंत मुले पळवणारी टोळी ऐकली होती. पण बाप पळवणा-यांंची औलाद आता महाराष्ट्रात फिरत आहे, असा घणाघात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईवर सध्या गिधाडे फिरत आहेत, अमित शाह हे त्यापैकीच एक आहेत. हिंमत असेल, तर महिनाभरात निवडणुका घेऊन दाखवा, मुंबईवर घिरट्या घालणा-या गिधाडांना आस्मान दाखवू, असा इशारा देतानाच त्यांनी यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, असा ठाम विश्वास पदाधिका-यांना दिला.

शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत तेजस ठाकरेही उपस्थित होते. शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये पदाधिका-यांचा मोठा उत्साह दिसून आला. राज्यातील सत्तांतरानंतर आणि शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर गटप्रमुखांचा हा पहिलाच मेळावा होता. भाषणाच्या सुरुवातीलाच संजय राऊत मोडेन पण वाकणार नाही, या निश्चयाने लढतात. ते मिंधे गटात गेले नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी त्यांनी भाजपवरही टीकास्त्र सोडले. मुंबईवर आज गिधाडे फिरत आहेत. निवडणुका आल्यावरच यांना मुंबईची आठवण येते. अमित शाह हे त्यापैकीच एक. शिवसेनेला त्यांनी जमीन दाखवणार असल्याचे सांगितले. पण आम्ही त्यांना आस्मान दाखवणार आहोत. ही शिवसेना मराठी माणसाच्या बलिदानातून मिळाली आहे. यांना ही हातात घेऊन विकायची आहे, असा आरोप त्यांनी केला.

राज्यातले प्रकल्प गुजरातला पळविले
महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प गुजरातला नेले जातात. प्रकल्प गुजरातला न्यायचे आणि नंतर त्याला भरभरून आर्थिक मदत द्यायची. वेदांता महाराष्ट्रात येण्यासाठी केंद्राने सवलत का दिली नाही, दिल्लीत जाता तर मग पंतप्रधानांना ठणकावून का विचारत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मुंबईकर कधीही झुकणार नाहीत
मुंबई जिंकांयचे म्हणजे नेमके काय, मुंबई जिंकायची म्हणजे पहिला मुंबईकरांची मने जिंकावी लागतात, ती शिवसेनेने जिंकली आहेत. मुंबईकरांच्या सुखदु:खात शिवसेनेने सहभाग घेतला. भाजपला बदल करायचा आहे, मुंबई दिल्लीकरांच्या पायी घालायची आहे. पण ही मुंबई छत्रपती शिवरायांची आहे, ती झुकणार नाही, असेही ठाकरेंनी ठणकावून सांगितले.

मिंधे गट व बाप पळवणारी टोळी
आतापर्यंत मी मुले पळवणारी टोळी बघितली होती. पण आता बाप पळविणारी टोळी फिरत असल्याची टीका करताना शिंदे गटाचा त्यांनी मिंधे सेना असा उल्लेख केला. भाजपच्या मिशन मुंबईवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे लचके तोडण्यासाठी आता गिधाडे फिरायला लागली आहेत. मुंबई त्यांच्यासाठी चौरसफुटाची जमीन असेल. पण आमच्यासाठी ती मुंबा आई आहे,आमची मातÞभूमी आहे. आमच्या आईवर जो वार करायला येईल त्याचा राजकारणात कोथळा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा दिला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या