बारामती : जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचे असेल तर विज्ञानाची साथ घेतली पाहिजे. माणूस चंद्रावर जातोय, हा बदल विज्ञानामुळेच होऊ शकल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. बारामतीतील हा प्रकल्प पाहिल्यानंतर तुम्हाला विज्ञानाची आवड निर्माण होईल असेही पवार म्हणाले.
आपणा सर्वांची वैज्ञानिक दृष्टी वाढावी, विज्ञानाच्या आधारे विचार करण्याची मानसिकता वाढावी यासाठी हा प्रकल्प दिशा देईल असेही पवार म्हणाले. आज बारामतीत सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी बारामतीत आले होते. या कार्यक्रमात पवार बोलत होते.
माणूस आता चंद्रावर, मंगळावर जात आहे. हा प्रचंड मोठा बदल आहे. हे सगळं विज्ञानामुळे शक्य झाल्याचे पवार यावेळी म्हणाले. आपणा सगळ्यांची वैज्ञनिक दृष्टी वाढावी, विज्ञानाच्या आधारे विचार करण्याची मानसिकता तयार होणे गरजेचे आहे. विज्ञानाच्या सहाय्याने यश कसे मिळवायचे याची माहिती होणे गरजेचे असल्याचे पवार म्हणाले. यासाठी हे केंद्र मार्गदर्शन करेल, हा प्रकल्प पाहिल्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढेल. विज्ञानाच्या संबंधीचे आकर्षण वाढेल असेही पवार म्हणाले.
राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन, महाराष्ट्र सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमासाठी गौतम अदानी आले होते. तसेच या उद्घाटनासाठी आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. बारामतीतील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात हे सायन्स पार्क उभारण्यात आले आहे.
लहानपणापासूनच वैज्ञानिक वृत्ती वाढेल
राज्यभरात सध्या चर्चिल्या जात असलेल्या या सायन्स पार्कमध्ये मुलांच्या बौद्धिक कौशल्य व वैज्ञानिक जागृती वाढीसाठी वेगवेगळे प्रकल्प असणार आहेत. या माध्यमातून शालेय दशेपासूनच विद्यार्थी स्वतंत्रपणे जगातील प्रत्येक कुतुहल असणा-या गोष्टीविषयी आपल्या वेगळ्या सिद्धांताची मांडणी करू शकतील. तसेच त्यांच्यात लहानपणीच वैज्ञानिक वृत्ती वाढीस लागणार असल्याची माहिती राजेंद्र पवार यांनी दिली.