मुंबई : काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरही उपस्थित होते. या तिघांच्या भेटीमागचे कारण अस्पष्ट असून दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाली.
यानंतर राहुल नार्वेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना या भेटीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते बोलताना म्हणाले की, येत्या २३ जानेवारी रोजी विधान भवनात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण होणार आहे. या सोहळ्यासंदर्भात शिंदे-फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. या कार्यक्रमाचे आमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.
त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंबाला आमंत्रण देण्यात आले आहे. राहुल नार्वेकर म्हणाले, मी स्वत: त्यांच्याशी बोललो आहे. बाकी आमदार, खासदार, कला क्षेत्रातील सर्वांना आम्ही आमंत्रित केले आहे, असे नार्वेकर म्हणाले.
यावेळी या नेत्यांमध्ये पाऊणतास चर्चा झाली. या चर्चेत नेमके काय घडले? नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली? हे सर्व गुलदस्त्यात आहे. त्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. फडणवीस यांना रात्री उशिरा शिंदे यांची भेट घेण्याची गरज का पडली? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे नाव राज्याच्या राजकारणासह देशभर घेतले जाते. राजकारणात अनेक महत्त्वाच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग होता. पण त्यांनी कधीही राज्याच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला नाही. राजकारणातल्या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचे हे तैलचित्र विधिमंडळात लावण्यात येणार आहे.